शिर्डी नगरपरिषदेसाठी ११ प्रभाग आणि २३ नगरसेवक, प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा जाहार

Author Picture
By Vaishnavi Swami Published On: August 19, 2025

शिर्डी- शिर्डी नगरपरिषदेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा सोमवार दि. १८ ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात आला. या आराखड्यानुसार नगरपरिषदेसाठी ११ प्रभाग आणि २३ नगरसेवक सदस्य राहणार आहेत. नागरिकांना या आराखड्यावर हरकती व सूचना दाखल करण्याची संधी ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत उपलब्ध असणार आहे.

सोमवारी सकाळी शिर्डी नगरपरिषद कार्यालयात मुख्याधिकारी सतीश दिघे यांच्या उपस्थितीत प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली. या नव्या आराखड्यानुसार नगरपरिषदेसाठी ११ प्रभाग निश्चित करण्यात आले असून एकूण मतदारसंख्या ३६ हजार ४ इतकी आहे. प्रभाग क्रमांक १ मध्ये ३१७९, प्रभाग २ मध्ये २९९२, प्रभाग ३ मध्ये ३४४०, प्रभाग ४ मध्ये ३०१२, प्रभाग ५ मध्ये २९५०, प्रभाग ६ मध्ये ३०३९, प्रभाग ७ मध्ये २९४२, प्रभाग ८ मध्ये २९१४, प्रभाग ९ मध्ये ३३२८, प्रभाग १० मध्ये ३०९९ तर प्रभाग ११ मध्ये ५१०९ इतकी मतदारसंख्या निश्चित करण्यात आली आहे.

प्रभाग रचनेच्या प्रक्रियेचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे. १८ ते ३१ ऑगस्टदरम्यान प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करून त्यावर हरकती व सूचना मागविण्यात येतील. १ ते ८ सप्टेंबरदरम्यान प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांवर सुनावणी होईल. ९ ते ११ सप्टेंबरदरम्यान सुनावणीनंतर शिफारशी विचारात घेऊन अंतिम प्रभाग रचना तयार करून नगरविकास विभागास सादर केली जाईल.

१२ ते १८ सप्टेंबरदरम्यान नगरविकास विभागाने अंतिम प्रभाग रचना राज्य निवडणूक आयोगास सादर करायची आहे. त्यानंतर २६ ते ३० सप्टेंबरदरम्यान राज्य निवडणूक आयोगाने अधिसूचनेद्वारे अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध केली जाणार आहे. आगामी शिर्डी नगरपरिषद निवडणूक चुरशीची होणार असल्याचे चित्र दिसत आहे.

नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी अनेक इच्छुक मैदानात उतरण्यास सज्ज झाले आहेत. विशेषतः नगराध्यक्ष पदाचे आरक्षण कोणत्या संवर्गाला मिळते यावर मोठे समीकरण अवलंबून आहे. मात्र नगराध्यक्ष पद न मिळाले तरी नगरसेवक होण्यासाठी अनेक इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत.

अहिल्यानगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा आणि आमचे फेसबुक पेज लाईक करा