अहिल्यानगर पुणे महामार्गावर गेली शेळकेंची 4 माणसं, तिथंच नितीन शेळकेंचा मृत्यू… योगायोग की हलगर्जीपणा ?

Author Picture
By Vaishnavi Swami Published On: July 9, 2025

अहिल्यानगर-पुणे महामार्गावरील जातेगाव फाटा पुन्हा एकदा भीषण अपघातामुळे चर्चेत आला आहे. रविवारी रात्री साडे दहा ते अकरा वाजेच्या सुमारास दुचाकीस्वार नितीन शेळके यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.भाजप आमदार सुरेश धस यांचा मुलगा सागर धस यांच्या गाडीने नितीन यांच्या दुचाकीला जोरदार ठोकर दिल्यानंतर घटनास्थळीच नितीन शेळके यांचा मृत्यू झाला.

अपघातानंतर सागर धस यांनी तातडीने नितीन शेळके यांना रुग्णालयात नेण्यासाठी मदत केल्याची माहिती शेळके कुटुंबियांनी दिली. “आम्हाला त्यांचं नाव माहिती नव्हतं, पण त्यांनी माणुसकी जपली,” असं त्यांनी नमूद केलं. सुपा पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून, सागर धस यांची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली आहे. त्यांची कार पोलिसांकडे जमा करण्यात आली आहे.

या अपघातामुळे केवळ नितीन शेळके यांचेच नव्हे तर त्यांच्या मागे राहिलेल्या कुटुंबाचेही सर्वस्व उद्ध्वस्त झाले आहे. गेली सहा वर्षं ते हॉटेल सह्याद्री चालवत होते. या व्यवसायावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून होता. त्यांच्या जाण्याने कुटुंब अचानक अनिश्चिततेच्या गर्तेत सापडले आहे.

एका ठिकाणी २० पेक्षा अधिक मृत्यू


या अपघाताने पुन्हा एकदा त्या ठिकाणाची असुरक्षितता अधोरेखित केली आहे. यापूर्वीही या ठिकाणी 11 जणांचा मृत्यू झाला असून, त्यातील 4 जण हे शेळके कुटुंबातीलच होते. एकूण मृतांची संख्या 20 पार गेली आहे. तरीही ना स्पीड ब्रेकर बसवण्यात आला, ना कोणतीही चेतावणी सूचना लावण्यात आली आहे.

शेळके कुटुंबियांनी यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. “प्रशासन किती निष्क्रिय राहणार? अजून किती निष्पाप जीव गमावल्यावर उपाययोजना होतील?” असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. या अपघातप्रवण ठिकाणी प्रशासनाची थंड प्रतिक्रिया ही नागरिकांच्या जीवाशी चाललेला प्रत्यक्ष अपमान आहे.

मृतांची यादी

जातेगाव फाट्यावर झालेल्या विविध अपघातांमध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे पुढीलप्रमाणे:
पोपट शेळके
दत्तात्रय शेळके
अशोक शेळके
संपत शेळके
दिलीप वाखारे
रामदास गाडीलकर
बाळासाहेब तरटे
प्रभू गाडीलकर
सुनिल नवले
आईशा शेख
जालिंदर पळसकर

हा अपघात केवळ एक घटना नसून, प्रशासनाच्या अपयशाचे मूर्त स्वरूप आहे. नागरिकांचे जीव वाचवण्याची जबाबदारी सरकारी यंत्रणेवर असताना ती वारंवार झोपलेली दिसते. स्थानिक प्रशासन, महामार्ग प्राधिकरण, आणि राजकीय प्रतिनिधींनी तातडीने पावले उचलणे अत्यंत गरजेचे आहे.स्पीड ब्रेकर, चेतावणी फलक, आणि कॅमेऱ्यांची यंत्रणा हे काही तातडीचे उपाय असू शकतात. मात्र त्याहूनही अधिक महत्त्वाचे म्हणजे जीव वाचवण्याची इच्छाशक्ती प्रशासनात निर्माण होणे — अन्यथा हे ठिकाण मृत्यूचा सापळा बनत राहील.

अहिल्यानगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा आणि आमचे फेसबुक पेज लाईक करा