जामखेड- वेटरने काठीने केलेल्या मारहाणीत एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना जामखेड तालुक्यातील शिऊर फाटा येथील एका हॉटेलमध्ये रविवारी (दि.१७) रात्री घडली. या प्रकरणी हॉटेलमधील वेटरला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
ज्योतीराम शामराव काशिद (वय ३६, रा. काशिद वस्ती, सारोळा, ता. जामखेड) असे मारहाणीत मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी मयताचा भाऊ लक्ष्मण शामराव काशिद (वय ३०, रा. काशिद वस्ती, सारोळा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दीपक गुलाबराव सातपुते (रा. मनमाड, जि. नाशिक) याच्या विरोधात जामखेड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, ज्योतीराम काशिद हा रविवारी सायंकाळी मोबाईलवर बोलत घराबाहेर गेला होता. मात्र रात्रभर तो घरी आलाच नाही. यामुळे मयताचा भाऊ लक्ष्मण काशिद याने त्यास सकाळी फोन लावला. मात्र त्याने फोन उचलला नाही. यानंतर सकाळी साडेनऊ वाजता लक्ष्मण काशिद यास समजले की शिऊर फाटा येथील एका हॉटेलमध्ये भाऊ ज्योतीराम यास मारहाण झाली असून तो गंभीर जखमी झाला आहे.
त्यानंतर लक्ष्मण हा नातेवाईकांसमवेत घटनास्थळी गेला. त्या ठिकाणी रक्ताने माखलेली काठी दिसून आली. त्यावेळी वेटर दीपक गुलाबराव सातपुते याच्याकडे चौकशी केली असता त्याने ज्योतीराम काशिद यास आपणच काहीही कारण नसताना लाकडी काठीने मारहाण केली. त्या मारहाणीत ज्योतीराम काशिद याचा मृत्यू झाला आहे, असे वेटरने सांगितले. त्याने वेटर दीपक सातपुते याने स्वतः गुन्ह्याची कबुली दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
घटनेची माहिती मिळताच जामखेडचे पोलीस उपनिरीक्षक किशोर गावडे, पो. ना. रविंद्र वाघ, पो. कॉ. देवीदास पळसे, नवनाथ शेकडे, गणेश काळाने, कुलदीप घोळवे घटनास्थळी दाखल झाले व आरोपीस ताब्यात घेतले. यानंतर पो. कॉ. देविदास पळसे, घटनास्थळी दाखल झाले. मयत ज्योतिराम काशिद याचा मृतदेह जामखेड ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी दाखल केला. घटनास्थळी पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी भेट दिली.








