अहिल्यानगर- सावेडी उपनगरातील टीव्ही सेंटर येथील म्युन्सिपल कॉलनी येथे युवकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (दि. २७) रात्री साडेआठ वाजता घडली. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
गुमण्या दमण्या वसावे (वय १८, रा. म्युनिसिपल कॉलनी, टीव्ही सेंटर, सावेडी, मूळ रा. अक्कलकुवा, जि. नंदुरबार) असे मयत युवकाचे नाव आहे. बुधवारी रात्री साडेआठ वाजता गुमण्या वसावे याने राहत्या घरी गळफास घेतला.
यावेळी त्याचा मामा सुनील रूपा वसावे (वय २६, रा. उमरा गावाळ, ता. अक्कलकुवा, जि. नंदूरबार) यांनी तातडीने त्याला जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारासाठी आणले. मात्र तेथे वैद्यकीय अधिर्कायांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती तोफखाना पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास पोलीस अंमलदार चांगदेव आंधळे करीत आहेत.








