अहिल्यानगर- जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रातील प्रलंबित प्रश्नांना तातडीने तोडगा काढावा, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले. औद्योगिक भागात स्वच्छता व सुरक्षितता राखत निर्माण होणारा कचरा त्वरित हटविण्याचे आदेश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. अतिक्रमणासह अवैध व्यवसायांवर कठोर कारवाई करावी, असेही ते म्हणाले.
उद्योग मित्र समितीच्या बैठकीत आढावा
श्रीरामपूर औद्योगिक क्षेत्र कार्यालयात जिल्हा उद्योग मित्र समितीची बैठक पार पडली. या बैठकीत डॉ. आशिया यांनी सविस्तर आढावा घेतला. यावेळी एमआयडीसीचे विभागीय अधिकारी गणेश राठोड, महाव्यवस्थापक दीपक शिवदास, व्यवस्थापक अशोक बेनके, क्षेत्र व्यवस्थापक दिलीप काकडे, उपअभियंता संदीप बडगे, पोलिस निरीक्षक एन. बी. देशमुख तसेच उद्योजक संघटनांचे पदाधिकारी बाबासाहेब काळे, प्रकाश गांधी, नंदकुमार शिंदे व हरदीप सिंग सेठी आदी उपस्थित होते.
मूलभूत सुविधांची गरज अधोरेखित
औद्योगिक क्षेत्रातील कामकाज अधिक सुलभ करण्यासाठी अग्निशमन केंद्र, पथदिवे, रस्ते व ड्रेनेजसारख्या मूलभूत सुविधांची तातडीने पूर्तता व्हावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. तसेच वाढीव पाणीपुरवठ्यासाठी सविस्तर प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठविण्याचे आदेशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
कायदा व सुव्यवस्थेसाठी पोलीस विभागाला सूचना
औद्योगिक परिसरातील कायदा व सुव्यवस्था सुरळीत राखणे हे महत्त्वाचे असल्याचे सांगत डॉ. आशिया यांनी पोलीस विभागाला गस्त वाढविण्याचे निर्देश दिले. स्थानिक उद्योजक व पोलिस यांच्यात समन्वय वाढवून औद्योगिक वातावरण सुरक्षित ठेवण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली.
उद्योजकांच्या मागण्यांवर भर
बैठकीत उपस्थित उद्योजकांनी वाढीव पाणीपुरवठा, रस्त्यांची देखभाल, कचरा व्यवस्थापन व अतिक्रमण या विषयांवर ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून शक्य तितक्या लवकर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.








