Ahilyanagar BJP Politics : श्रीरामपूरमध्ये भाजपच्या मंडल अध्यक्षपदावरून स्थानिक राजकारणात नवा वाद उफाळला आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील समर्थक आणि भाजपच्या जुने वजनदार कार्यकर्ते अशा दोन गटांमध्ये संघर्षाची ठिणगी पडली असून, बॅनरबाजीच्या माध्यमातून आरोप-प्रत्यारोपांचा सामना रस्त्यावर सुरू झाला आहे.
शहरात विविध ठिकाणी लावण्यात आलेल्या बॅनरमध्ये “भाजप मंडल अध्यक्ष व्हायचंय? मग काँग्रेसचा डीएनए असणं आवश्यक आहे!” अशा टीका करत खोचक शब्दांत भाजपच्या सध्याच्या नियुक्ती प्रक्रियेला झणझणीत टोले लगावले गेले आहेत.
“पैसे आणि पॉवर असले की भाजपमध्ये पोस्ट मिळते!”
या बॅनरमध्ये थेट आरोप करण्यात आला आहे की, फोर्च्यूनर गाडी, भरपूर पैसा, काँग्रेसशी पूर्वसंबंध, गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि पक्षाशी खरी निष्ठा नसतानाही मंडल अध्यक्षपद मिळते! मुलाखत न दिली तरी चालते, ४५ वयाची अटही पैसेवाल्यांसाठी शिथिल होते, अशा प्रकारच्या अटींच्या माध्यमातून पक्षांतर्गत कार्यपद्धतीवर उपरोधिक टीका केली गेली आहे.
या बॅनरबाजीला “एक श्रीरामपूरकर” अशी स्वाक्षरी असल्याने ही मोहिम स्थानिक जनतेच्या भावना म्हणून सादर केली जात असली, तरी राजकीय वर्तुळात हा जुना भाजप विरुद्ध विखे समर्थक असा संघर्ष असल्याचे मानले जात आहे.
शेवगाव व वाळकी मंडळ नियुक्त्यांना स्थगिती
हे वाद केवळ श्रीरामपूरपुरते मर्यादित राहिले नाहीत. शेवगावमध्ये विखे समर्थक अमोल सागडे यांची मंडल अध्यक्ष म्हणून झालेली नियुक्ती वादात अडकली असून, तक्रारीनंतर भाजपचे कार्याध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी ती थांबवली आहे. त्याचप्रमाणे वाळकी चिचोंडी मंडळातही अशाच स्वरूपाचा वाद असल्याची माहिती समोर आली आहे.
भाजप प्रदेश नेतृत्व काय भूमिका घेणार?
या वादाने भाजपच्या अंतर्गत गटबाजीचा उघडपणे भांडाफोड केला आहे. सत्ताधारी पक्षाच्या संघटनात्मक निर्णयांवर अशी सार्वजनिक टीका होणं पक्षासाठी गंभीर बाब आहे. त्यामुळे या परिस्थितीवर भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून काय पावलं उचलली जातात, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.








