तालुक्यातील पठारभागात घडलेल्या एका गंभीर प्रकरणामुळे शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. आठवीत शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीचे तिच्याच शिक्षकाने कथित शारीरिक शोषण केल्याची बाब समोर आली असून संबंधित विद्यार्थिनी गर्भवती असल्याचे वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झाले आहे. घटनेनंतर पोलिसांनी तातडीने गुन्हा नोंदवत आरोपीला अटक केली आहे.
घरगुती परिस्थितीचा गैरफायदा घेतल्याचा आरोप
घारगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित विद्यार्थिनी आठवीत शिक्षण घेत असून काही घरगुती कारणांमुळे ती शाळेत एकटी राहत होती. या परिस्थितीचा फायदा घेत आरोपी शिक्षक अमोल बाबासाहेब भोसले (वय 23) याने विद्यार्थिनी अल्पवयीन असल्याची जाणीव असूनही तिच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. हा प्रकार काही काळ गुप्त राहिला होता.
रुग्णालयात उपचारादरम्यान उघडकीस आले प्रकरण
विद्यार्थिनीला उपचारासाठी पिंपरी चिंचवड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असता वैद्यकीय तपासणीत ती गर्भवती असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर विद्यार्थिनीने दिलेल्या जबाबाच्या आधारे पिंपरी चिंचवड पोलीस यांनी भारतीय न्यायसंहिता तसेच पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.
झिरो नंबरने घारगाव पोलिसांकडे वर्ग
प्राथमिक गुन्हा नोंदवल्यानंतर हा गुन्हा झिरो नंबरने घारगाव पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. आरोपी शिक्षकाला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला शुक्रवार (दि. 6) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
तपास सुरू, पोलिसांचे मार्गदर्शन
या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एस. डी. टकले करत आहेत. घटनेनंतर परिसरात संताप व्यक्त होत असून पोलिसांनी तपासाची गती वाढवली आहे.








