पिंपरी-चिंचवड येथील एका व्यापाऱ्याचे अपहरण करून खंडणी वसूल करण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीला संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा टोलनाक्यावर पोलिसांनी अटक केली. उत्तर प्रदेशातील पाच जणांचा समावेश असलेल्या या टोळीला सोमवारी रात्री उशिरा सापळा रचून पकडण्यात आले. कारवाईदरम्यान पोलिसांनी दोन गावठी बनावटीचे कट्टे, सहा जिवंत काडतुसे आणि कारसह एकूण सुमारे ११ लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
अपहरणानंतर पोलिसांना मिळाली माहिती
पिंपरी-चिंचवड परिसरातील एका व्यापाऱ्याचे खंडणीसाठी अपहरण केल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर विविध पोलिस पथके सक्रिय झाली. अपहरणकर्त्यांनी वापरलेली कार आळेफाटा मार्गे संगमनेरच्या दिशेने येत असल्याची माहिती श्रीरामपूर विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी संगमनेर उपविभागीय पोलीस कार्यालयाला दिली.
या माहितीच्या आधारे संगमनेर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तातडीने कारवाईची तयारी सुरू केली.
टोलनाक्यावर पोलिसांचा सापळा
माहितीनुसार संशयित वाहन हिवरगाव पावसा टोलनाक्यावरून जाणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी तेथे नाकाबंदी केली. पोलीस नाईक बापूसाहेब हांडे, पोलीस कॉन्स्टेबल राहुल सारबंदे, सुनील ढाकणे, चालक पोहेकॉ. संतोष फड आणि पोहेकॉ. शांताराम मालुंजकर यांच्या पथकाने टोलनाका परिसरात लक्ष ठेवले होते.
याचवेळी तालुक्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांनाही माहिती देण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली खांडगाव फाटा परिसरात सहायक पोलीस निरीक्षक विकास काळे, पोलीस उपनिरीक्षक शलमोन सातपुते, पोहेकॉ. सचिन उगले आणि पोहेकॉ. शांताराम झोडगे यांनी नाकाबंदी केली.
दरम्यान, पिंपरी-चिंचवड स्थानिक गुन्हे शाखेचे पथकही आरोपींचा मागोवा घेत होते.
कार अडवून संशयितांना ताब्यात
सोमवारी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास पुणे दिशेकडून संगमनेरकडे येणारी काळ्या रंगाची कार टोलनाका परिसरात दिसली. पोलिसांनी संशयित वाहन ओळखून अत्यंत दक्षतेने ती कार अडवली.
कारची तपासणी केली असता त्यामध्ये पाच जण असल्याचे आढळून आले. त्यामध्ये चंद्रशेखर दीपकचंद्र गौड (वय ३४), दिलीप मोहनलाल सरोज (वय २८), अनिल गिरीधारीलाल सरोज (वय २६), मुकेशकुमार राममुदर चव्हाण (वय २४) हे सर्व उत्तर प्रदेशातील प्रतापगड जिल्ह्यातील रहिवासी असून त्यांच्यासोबत एक अल्पवयीन मुलगाही असल्याचे पोलिसांनी सांगितले.
शस्त्रांसह मोठा मुद्देमाल जप्त
संशयितांची झडती घेतली असता त्यांच्या ताब्यात दोन गावठी कट्टे आणि सहा जिवंत काडतुसे आढळून आली. तसेच पाच मोबाईल फोन, एक घड्याळ आणि वापरलेली कार असा एकूण सुमारे ११ लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
पोलिसांनी सर्व आरोपींना ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या पथकाकडे सुपूर्द केले.
कारवाईदरम्यान टोलनाका कर्मचाऱ्यांचे सहकार्य
या संपूर्ण कारवाईत हिवरगाव पावसा टोलनाका व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांनी पोलिसांना आवश्यक सहकार्य केल्याची माहिती देण्यात आली. त्यांच्या मदतीमुळे पोलिसांना संशयित वाहन ओळखणे आणि अडवणे सोपे झाल्याचे सांगितले जात आहे.








