आज होणाऱ्या खग्रास चंद्रग्रहणामुळे शिर्डीतील साईभक्तांसाठी महत्त्वाची सूचना जारी करण्यात आली आहे. ग्रहणाच्या काळात धार्मिक परंपरा आणि शास्त्रमान्य नियमांचे पालन करत श्री साईबाबा संस्थानने दर्शन व्यवस्थेत तात्पुरता बदल जाहीर केला आहे. देश-विदेशातून मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असून मंदिर प्रशासनाने वेळापत्रकात करण्यात आलेल्या बदलाची माहिती अधिकृतपणे प्रसिद्ध केली आहे.
श्री साईबाबा समाधी मंदिर येथे आज दुपारी 3:20 ते सायंकाळी 6:48 या वेळेत भाविकांसाठी दर्शन पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहे. हीच वेळ चंद्रग्रहणाची मानली जात असल्याने शास्त्रानुसार मंदिराचे दरवाजे भक्तांसाठी बंद राहतील. या कालावधीत संस्थानच्या अखत्यारीतील सर्व उपमंदिरांमध्येही दर्शन व्यवस्था स्थगित राहणार आहे.
ग्रहणकाळात धार्मिक विधी मात्र सुरू
मंदिराचे दरवाजे बंद असले तरी धार्मिक परंपरा खंडित होणार नाहीत. ग्रहणाच्या काळात मंदिर परिसरात वेदपठण, मंत्रोच्चार आणि नियोजित धार्मिक विधी सुरूच राहतील. मंदिरातील पुजारी वर्ग नियमानुसार पूजाविधी पार पाडणार असून ग्रहण संपल्यानंतर शास्त्रोक्त पद्धतीने शुद्धीकरण प्रक्रिया करण्यात येईल.
ग्रहणानंतरची आरती आणि नियमित वेळापत्रक
सायंकाळी 6:48 वाजता ग्रहणाची मोक्षवेळ संपल्यानंतर मंदिरात शुद्धीकरण विधी पार पडतील. त्यानंतर सायंकाळी 7 वाजता मंगलस्नान होईल. मंगलस्नानानंतर ‘शिर्डी माझे पंढरपूर’ ही आरती आणि धुपारती नियमानुसार संपन्न केली जाईल. धुपारतीनंतर भाविकांसाठी दर्शन व्यवस्था पुन्हा पूर्ववत करण्यात येईल. रात्री 10 वाजता परंपरेनुसार नियमित शेजारती होणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
भाविकांना वेळापत्रकाची नोंद घेण्याचे आवाहन
चंद्रग्रहणाच्या निमित्ताने करण्यात आलेला हा तात्पुरता बदल लक्षात घेऊन भाविकांनी आपल्या दर्शनाचे नियोजन करावे, असे आवाहन संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी केले आहे. विशेषतः दूरवरून येणाऱ्या भक्तांनी वेळापत्रकाची अचूक माहिती घेऊन मंदिर प्रशासनाला सहकार्य करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.








