युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम शिक्षण व्यवस्थेवर
आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे निर्माण झालेल्या गॅस टंचाईचा परिणाम आता शालेय शिक्षण व्यवस्थेवरही दिसू लागला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहार योजनेवर या परिस्थितीचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. जिल्ह्यातील हजारो शाळांमध्ये दररोज लाखो विद्यार्थ्यांसाठी जेवण तयार केले जाते. मात्र गॅस सिलिंडर उपलब्धतेत अडथळे निर्माण झाल्यास विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
साडेचार हजार शाळांमधून लाखो विद्यार्थ्यांना पोषण आहार
अहिल्यानगर जिल्ह्यात पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी चालणाऱ्या प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत एकूण ४ हजार ५३७ शाळांमध्ये पोषण आहार शिजवून विद्यार्थ्यांना दिला जातो. या शाळांमधून सुमारे ४ लाख ४६ हजार ८७७ विद्यार्थ्यांना दररोज गरम व ताजे जेवण पुरवले जाते. या योजनेमुळे ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांच्या पोषणाची गरज पूर्ण करण्यास मोठी मदत होत आहे.
या आहाराची तयारी करण्यासाठी शहरी भागातील शाळांमध्ये महिला बचत गटांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर ग्रामीण भागात स्थानिक महिलांना स्वयंपाकाची जबाबदारी देण्यात आली आहे. शासनाकडून या स्वयंपाकासाठी घरगुती गॅस सिलिंडर उपलब्ध करून दिले जातात.
गॅस उपलब्धतेत अडथळे निर्माण
सध्या राज्यभर गॅस सिलिंडरच्या उपलब्धतेत अडचणी निर्माण झाल्याचे चित्र आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅस पुरवठा साखळीवर परिणाम झाला असून अनेक ठिकाणी सिलिंडरची टंचाई जाणवू लागली आहे. त्यामुळे घरगुती ग्राहकांनाही सिलिंडर मिळवणे कठीण होत आहे. त्याचबरोबर व्यावसायिक गॅस सिलिंडरचे वितरणही अनेक ठिकाणी मंदावले किंवा थांबले असल्याचे दिसत आहे.
या पार्श्वभूमीवर शाळांमध्ये पोषण आहार शिजवण्यासाठी लागणाऱ्या गॅस सिलिंडरचा पुरवठा खंडित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या जेवणाच्या व्यवस्थेत अडथळे येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
शाळांना प्राधान्याने गॅस पुरवठ्याचे निर्देश
ही परिस्थिती लक्षात घेऊन प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजना, प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र, पुणे यांनी भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम आणि इंडियन ऑईल या कंपन्यांना विशेष सूचना दिल्या आहेत. शाळांमध्ये पोषण आहार तयार करणाऱ्या स्वयंपाकगृहांना प्राधान्याने घरगुती गॅस सिलिंडर उपलब्ध करून द्यावेत, असे पत्राद्वारे कळविण्यात आले आहे.
ग्रामीण भागातील शाळांना साधारणपणे घरगुती वापराचे सिलिंडर दिले जातात, तर शहरी भागातील बचत गटांकडे व्यावसायिक गॅस टाक्यांचा वापर केला जातो. मात्र सध्याच्या परिस्थितीत दोन्ही प्रकारच्या सिलिंडरची उपलब्धता मर्यादित झाल्याने प्रशासनाने तातडीने पुरवठा करण्यावर भर दिला आहे.
विद्यार्थी संख्येनुसार वाढते गॅसचे प्रमाण
जिल्ह्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेऊन गॅस सिलिंडरचा वापर केला जातो. साधारणपणे शंभर विद्यार्थ्यांपर्यंत पट असलेल्या शाळांना महिन्याला दोन सिलिंडर पुरेसे ठरतात. मात्र हजार किंवा त्यापेक्षा जास्त विद्यार्थ्यांची संख्या असलेल्या मोठ्या शाळांना महिन्याला दहा किंवा त्यापेक्षा अधिक गॅस सिलिंडरची आवश्यकता भासते.
या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शाळांमध्ये पोषण आहाराची व्यवस्था सुरळीत चालू ठेवण्यासाठी नियमित गॅस पुरवठा अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात दर महिन्याला सात हजार सिलिंडरची आवश्यकता
प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील स्वयंपाकगृहांना दर महिन्याला साधारण १.६० ते १.७० लाख एलपीजी गॅस सिलिंडरची गरज भासते. यापैकी केवळ अहिल्यानगर जिल्ह्यातील शाळांसाठीच दर महिन्याला सुमारे सात हजार सिलिंडर आवश्यक असल्याचे प्रशासनाच्या आकडेवारीतून समोर आले आहे. हा पुरवठा नियमित न झाल्यास जिल्ह्यातील पोषण आहार योजनेच्या अंमलबजावणीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
तालुकानिहाय शाळा व विद्यार्थी संख्या
जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर शाळा आणि विद्यार्थ्यांचा समावेश आहे. अकोले तालुक्यात ४५८ शाळांमध्ये २७ हजार २९७ विद्यार्थी पोषण आहार घेतात, तर संगमनेरमध्ये ४६३ शाळांमध्ये ४७ हजार २३१ विद्यार्थी आहेत. कोपरगावमध्ये २२२ शाळांमधून २९ हजार १५९ विद्यार्थ्यांना आहार दिला जातो, तर राहाता तालुक्यात २०९ शाळांमधील २९ हजार ४०६ विद्यार्थी या योजनेचा लाभ घेतात.
श्रीरामपूर तालुक्यात १८७ शाळांमध्ये २८ हजार १०५ विद्यार्थी, नेवासा तालुक्यात ३१८ शाळांमध्ये ३९ हजार ४९२ विद्यार्थी, शेवगावमध्ये २६९ शाळांमधून २५ हजार १३९ विद्यार्थी आणि पाथर्डीत ३४४ शाळांमधील सुमारे २५ हजार विद्यार्थी पोषण आहार घेतात.
याशिवाय कर्जत तालुक्यात ३१६ शाळांमध्ये २४ हजार ५५ विद्यार्थी, जामखेडमध्ये १९९ शाळांमध्ये १७ हजार ३४२ विद्यार्थी, श्रीगोंद्यात ४३१ शाळांमध्ये ३० हजार ८८५ विद्यार्थी, पारनेरमध्ये ३९२ शाळांमध्ये २४ हजार ८६९ विद्यार्थी पोषण आहार घेत आहेत. नगर तालुक्यात २८१ शाळांमध्ये ३० हजार ३७९ विद्यार्थी असून महानगरपालिकेच्या हद्दीत १३५ शाळांमधील ३६ हजार ३५२ विद्यार्थ्यांना दररोज पोषण आहाराचा लाभ दिला जात आहे.








