Ahilyanagar Breaking: कायनेटीक चौकात वाहतूक पोलिसावर हल्ला, आरोपी ताब्यात

Author Picture
By Vaishnavi Swami Published On: March 3, 2026

अहिल्यानगर शहरातील गजबजलेल्या कायनेटीक चौकात वाहतूक नियमन करत असलेल्या पोलिसावर दुचाकीस्वाराने हल्ला केल्याची घटना रविवारी सायंकाळी उघडकीस आली. कर्तव्यावर असलेल्या पोलिसाला गचांडी धरून शिवीगाळ व मारहाण करण्यात आल्याने परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाहतूक कोंडीतून वादाची ठिणगी

या प्रकरणी वाहतूक शाखेचे पोलीस अंमलदार गणेश शिंदे यांनी तक्रार दाखल केली आहे. रविवारी (1 मार्च) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ते कायनेटीक चौकात नियमित वाहतूक नियंत्रणाचे काम करत होते. त्याचवेळी दोन दुचाकीस्वारांनी रस्त्याच्या मध्यभागी वाहने उभी करून परस्परांत वाद सुरू केला. यामुळे चौकात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

मध्यस्थी करताच पोलिसावर हल्ला

परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अंमलदार शिंदे यांनी संबंधितांना बाजूला घेऊन वाद थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळी अजित बाळासाहेब भोगाडे (वय 22, रा. साकत, ता. आष्टी, जि. बीड) याने पोलिसांशी वाद घालण्यास सुरुवात केली. तक्रारीनुसार, त्याने शिंदे यांची गचांडी धरून शिवीगाळ केली आणि शारीरिक मारहाण केली.

कर्मचाऱ्यांची धाव, आरोपी ताब्यात

घटनास्थळी उपस्थित इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करून अंमलदार शिंदे यांची सुटका केली. घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारीही घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतले.

सरकारी कामात अडथळा प्रकरणी गुन्हा

या घटनेप्रकरणी अजित भोगाडे याच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, शिवीगाळ व मारहाण केल्याचा गुन्हा कोतवाली पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस यंत्रणा करीत आहे.

 

 

अहिल्यानगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा आणि आमचे फेसबुक पेज लाईक करा