Ahilyanagar: पाथर्डी पंचायत समितीवर सीईओंचा अचानक छापा; तीन कर्मचारी गैरहजर

Author Picture
By Vaishnavi Swami Published On: March 13, 2026

कामकाजातील त्रुटींवर थेट निरीक्षण

पाथर्डी पंचायत समितीच्या कामकाजातील शिस्तभंग, अस्वच्छता आणि प्रशासकीय विलंबाच्या तक्रारींची दखल घेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी गुरुवारी पंचायत समिती कार्यालयाला अचानक भेट देत सर्व विभागांची सखोल तपासणी केली. कार्यालयातील उपस्थिती, स्वच्छता, विभागनिहाय कामकाज आणि विविध योजनांच्या अंमलबजावणीचा त्यांनी प्रत्यक्ष आढावा घेतला. या पाहणीदरम्यान तीन कर्मचारी गैरहजर असल्याचे आढळून आल्याने त्यांना विना पगारी करण्याच्या सूचना देण्यात आल्या, तर वारंवार उशिरा येणाऱ्या आणि अनुपस्थित राहणाऱ्या कर्मचार्‍यांवर शोकॉज नोटीस देण्याचा इशारा देण्यात आला.

अचानक भेटीने कार्यालयात धावपळ

गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास सीईओ भंडारी पंचायत समिती कार्यालयात दाखल झाले. त्यांच्या अचानक भेटीमुळे कार्यालयातील अधिकारी व कर्मचार्‍यांमध्ये एकच धावपळ उडाल्याचे चित्र दिसून आले. कार्यालय परिसरातील अस्वच्छता, अव्यवस्थित ठेवलेले साहित्य आणि उशिरा येणाऱ्या कर्मचार्‍यांबाबत त्यांनी गटविकास अधिकारी संगीता पालवे यांच्याकडून माहिती घेतली.

भंडारी कार्यालयात पोहोचताच कर्मचार्‍यांनी घाईघाईने स्वच्छता सुरू केल्याचेही दिसून आले. कार्यालय परिसरात पडलेले साहित्य आवरणे, फाईली व्यवस्थित लावणे आणि परिसर स्वच्छ करण्याचे काम कर्मचारी तातडीने करत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. अधिकारी, कर्मचारी तसेच शिपाई सर्वजण कार्यालय आवरण्याच्या कामात गुंतलेले होते.

विभागप्रमुखांची बैठक आणि योजनांचा आढावा

या भेटीदरम्यान सीईओ भंडारी यांनी पंचायत समितीतील सर्व विभागप्रमुखांची स्वतंत्र बैठक घेतली. विविध विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेताना रोजगार हमी योजना, बांधकाम विभाग, प्रधानमंत्री आवास योजना, सामान्य प्रशासन तसेच इतर लोककल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीची माहिती त्यांनी मागवली.

रोजगार हमी योजनेशी संबंधित कागदपत्रांची तपासणी उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमार्फत करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पंचायत समितीचे एकूण कामकाज अपेक्षेप्रमाणे समाधानकारक नसल्याचेही त्यांनी बैठकीदरम्यान नमूद केले. गेल्या काही दिवसांपासून प्रसारमाध्यमांमध्ये पंचायत समितीच्या कामकाजाबाबत नकारात्मक बातम्या प्रसिद्ध होत असल्याने प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.

शिस्तभंगावर कारवाईचा इशारा

भेटीदरम्यान सर्व विभागप्रमुखांना कामकाजात सुधारणा करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या. बायोमेट्रिक उपस्थितीच्या आधारे उशिरा येणाऱ्या आणि विनाकारण अनुपस्थित राहणाऱ्या कर्मचार्‍यांवर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. कार्यालय परिसरातील अस्वच्छतेबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

पंचायत समिती आवारात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची नियमित स्वच्छता होत नसल्याचेही त्यांच्या निदर्शनास आले. याबाबत संबंधित कर्मचार्‍यांना त्यांनी फटकारले. तसेच शहरातील जिल्हा परिषद शाळांवर नगर परिषदेकडून घरपट्टी आकारली जात असल्याच्या मुद्द्यावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. याबाबत नगर परिषदेचे मुख्य अधिकारी संतोष लांडगे यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून शिक्षणाच्या कामात जिल्हा परिषदेला सहकार्य अपेक्षित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

रोजगार हमी योजनेतील तक्रारींची गंभीर दखल

तालुक्यात रोजगार हमी योजनेच्या कामकाजाबाबत सर्वाधिक तक्रारी येत असल्याचे निरीक्षण भंडारी यांनी नोंदवले. या योजनेशी संबंधित काही कामांमध्ये अनियमितता होत असल्याच्या तक्रारींची त्यांनी गंभीर दखल घेतली. संबंधित विभागातील कामकाजाची संपूर्ण दप्तर तपासणी करून चौकशी करण्याचे आदेश उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या योजनेशी संबंधित एका अधिकाऱ्याबाबत वारंवार तक्रारी येत असल्याची माहितीही समोर आली आहे. संबंधित अधिकारी बदलीसाठी प्रयत्न करत असल्याचे बोलले जात असून या प्रकरणात पुढे कोणती कारवाई होते याकडे तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

घरकुल योजनेबाबत तातडीचे निर्देश

पाहणीदरम्यान घरकुल योजनेशी संबंधित एक तक्रारही सीईओ भंडारी यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. शेकटे येथील नितीन बाबासाहेब घुले यांनी घरकुल योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचे अनुदान मिळण्यासाठी संबंधित अधिकार्‍यांशी वारंवार संपर्क साधला; मात्र त्यांना प्रतिसाद मिळत नसल्याची तक्रार करण्यात आली होती.

या प्रकरणाची दखल घेत भंडारी यांनी संबंधित अधिकार्‍यांना दूरध्वनीवरून संपर्क साधत घरकुलाची तातडीने पाहणी करून आवश्यक कार्यवाही करण्याचे कडक निर्देश दिले.

अहिल्यानगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा आणि आमचे फेसबुक पेज लाईक करा