Ahilyanagar Crime : नगर शहरातील एका प्रसिद्ध महाविद्यालयात शिकणाऱ्या १७ वर्षीय विद्यार्थ्यावर त्याच्याच वर्गातील काही सहाध्यायांनी जीवघेणा हल्ला केला. ही धक्कादायक घटना २९ ऑगस्ट रोजी दुपारी साडेएकच्या सुमारास घडली. या हल्ल्यात युवक गंभीर जखमी झाला असून सध्या त्याच्यावर खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
जखमीचे नाव युवराज अशोक खाडे (रा. शास्त्रीनगर, केडगाव) असे आहे. या प्रकरणी सिद्धार्थनगरमधील एका अल्पवयीन विद्यार्थ्यासह त्याच्या साथीदारांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
हल्ल्याची घटना
युवराज हा महाविद्यालयात एस.वाय.बी.ए.चा विद्यार्थी आहे. तो महाविद्यालयाच्या आवारातून जात असताना, वर्गातीलच एका विद्यार्थ्याने त्याला थांबवले आणि “आमच्याकडे वाकड्या नजरेने का पाहतो?” असा जाब विचारत लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली. त्याच्यासोबतच्या इतरांनीही हल्ल्यात भाग घेतला. त्यापैकी एकाने युवराजला खाली पाडून छातीवर बसत गळा दाबण्याचा प्रयत्न केला. तर दुसऱ्याने हातातील लोखंडी कड्याने त्याच्या गळ्यावर आणि मानेवर वार केले. यात त्याच्या गळ्याला व मानेच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली.
रुग्णालयात उपचार सुरू
हल्ल्यानंतर आरोपी युवक पळून गेले. काही सहविद्यार्थ्यांनी जखमी युवराजला तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करून त्याच्या कुटुंबीयांना माहिती दिली. त्यानंतर कुटुंबीयांनी महाविद्यालयात जाऊन माहिती घेतली असता आरोपी सिद्धार्थनगरमधील असल्याचे स्पष्ट झाले.
जखमी युवराजचे वडील अशोक ध्यानु खाडे यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी संबंधित आरोपींवर भारतीय दंड संहितेतील कलम १०९, ११५(२), ३(५) अंतर्गत खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.








