Ahilyanagar Crime : अहिल्यानगर जिल्ह्याच्या राहाता तालुक्यातील शिर्डीलगतच्या के लवड गावात शनिवारी, १६ ऑगस्ट रोजी भीषण घटना उघडकीस आली. एका पुरुषासह चार शाळकरी मुलांचे मृतदेह विहिरीत आढळले. पोलिसांच्या चौकशीत हे सर्व मृत एकाच कुटुंबातील असल्याचे निष्पन्न झाले. पती पत्नीच्या वादात पतीने आपल्या चार मुलांसह विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले, की या घटनेत मृत झालेले अरुण सुनील काळे (वय ३०, रा. चिखली कोरेगाव, ता. श्रीगोंदा) असून त्याच्यासह शिवाणी काळे (वय ८), प्रेम काळे (वय ७), वीर काळे (वय ६) आणि कबीर काळे (वय ५) अशी चार लहान मुले मृत्यूमुखी पडली. या घटनेबाबत शिर्डी उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक शिरीष वमने यांनी माहिती दिली.
अपर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनीही घटनास्थळी थांबून पाहणी केली. शिर्डी पिंपरी बाह्यवळण रस्त्यालगत केलवड कोन्हाळे शिवारातील विहिरीत उडी मारून अरुण काळे याने आपल्या मुलांसह जीवन संपविले. शनिवारी दुपारी एकच्या सुमारास दोन मृतदेह विहिरीत तरंगताना दिसल्याची माहिती केलवडचे पोलीस पाटील सुरेश गमे यांना मिळाली.
त्यांनी त्वरित राहाता पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण, राहाता नगरपरिषदेचे अग्निशमन प्रमुख अशोक साठे आणि शिर्डीचे अग्निशमन प्रमुख थोरात हे आपत्ती निवारण पथकासह घटनास्थळी दाखल झाले. विहिरीत ३० ते ३५ फुट पाणी असल्याने मृतदेह बाहेर काढण्यास अडचणी येत होत्या.
सुरुवातीला दोन लहान मुलांचे मृतदेह काढण्यात आले. त्यानंतर अरुण काळे यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला; रात्री उशिरा उर्वरित दोन मृतदेह बाहेर काढण्यात आले.पोलीस उपअधिक्षक शिरीष वमने यांनी दिलेल्या माहितीनुसार, अरुण काळे यांची पत्नी येवला येथे माहेरी गेली होती. तिला आणण्यासाठी तो मुलांसह मोटारसायकलवरून येवल्याकडे निघाला होता.
दरम्यान, पत्नीला फोन करून ‘तू नांदायला आली नाहीस, तर मी मुलांना ठार मारीन,’ अशी धमकी दिल्याचे समजते. त्यानंतर त्याने मुलांसह विहिरीत उडी घेतली. घटनास्थळी आढळलेली मोटारसायकल आणि मोबाईलवरून मृतदेहांची ओळख पटली. या घटनेने राहाता तालुका आणि संपूर्ण अहिल्यानगर जिल्हा हादरला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. शोधमोहीमेदरम्यान पावसाचा अडथळा निर्माण झाला होता.
अरुण काळे हे माहेरी गेलेल्या पत्नीला आणण्यासाठी चालले होते. त्यांची मुले अहिल्यानगर येथील वसतिगृहात शिकतात. तेथून त्यांनी मुलांना घेतले. केलवड शिवारात आल्यावर मोबाईल फोनवर पती व पत्नीत वाद झाले, त्यानंतर काळे यांनी चार मुलांसह विहिरीत उडी घेतल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. घटनास्थळी सापडलेली दुचाकी, मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतला. प्राथमिकदृष्ट्या पती पत्नीच्या वादातून घटना घडल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.








