अहिल्यानगर- जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने खरिप हंगामातील पिकांची स्थिती धोक्यात आली आहे. मागील वर्षी १४ ऑगस्टपर्यंत ३०५ मिमी पाऊस अपेक्षित असताना, यावर्षी जून ते ऑगस्टदरम्यान फक्त १७२ मिमी पाऊस झाला आहे. विशेषतः १ ते १४ ऑगस्टदरम्यान ९५.४ मिमी पावसाची गरज होती, परंतु केवळ २४ मिमी पावसाची नोंद झाली.
हवामानातील या लहरीपणाचा परिणाम केवळ खरिपावरच नव्हे, तर रब्बी पिकांच्या शाश्वतीवरही होत आहे.
मे महिन्यातील अवकाळी पावसाचा फटका
मे महिन्यात तब्बल २२० मिमी अवकाळी पाऊस झाल्याने खरिप पिकांच्या पेरणीचे वेळापत्रक विस्कळीत झाले. मशागतीचा योग्य काळ वाया गेल्याने पेरणी उशिरा झाली. पेरणीनंतरच्या उगवणीच्या टप्प्यातही पावसाने दगा दिला. ढगाळ हवामान आणि अधूनमधून होणाऱ्या हलक्या सरींमुळे शेतात गवत वाढले, ज्यामुळे तननाशकांवर खर्च वाढला.
जुलै महिन्यात पावसाचा अभाव
जुलै महिन्यात १५ दिवसांहून अधिक काळ पावसाचा पूर्ण अभाव होता, ज्यामुळे पिकांची वाढ खुंटल्याचे कृषी विभागाने मान्य केले आहे. आधीच कर्जबाजारी असलेल्या शेतकऱ्यांसमोर उत्पादन घटल्याने कर्जफेडीचे संकट निर्माण झाले आहे. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार, जून ते ऑगस्ट या कालावधीत ३०९ मिमी पाऊस अपेक्षित होता, मात्र केवळ १७४ मिमी पाऊस झाला आहे.
पेरणीचे प्रमाण आणि सध्याची स्थिती
जिल्ह्यात खरिपाचे एकूण क्षेत्र ७.१६ लाख हेक्टर असले, तरी प्रत्यक्ष पेरणी ६.९५ लाख हेक्टरवर झाली आहे, जे सरासरीच्या ९७.१५ टक्के आहे. पावसाचा अभाव असल्याने ओढे-नाले ओसंडून वाहिलेले नाहीत आणि अनेक तलाव अद्याप कोरडे आहेत. भूजल साठा वाढला नाही तर विहीर बागायत पट्ट्यातील रब्बी पिकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
किड नियंत्रणासाठी कृषी विभागाचा सल्ला
कापूस पिकावरील मावा व तुडतुडे नियंत्रणासाठी ५०% प्रोफेनोफॉस किंवा २५% ब्रुप्रोफेझीन, एससी २० मिली प्रति १० लिटर पाण्यात फवारणी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मका पिकावरील लष्करी अळी नियंत्रणासाठी १.५% इमामेक्टिन बेन्झोएट प्लस ३५% प्रोफेनोफॉस, डब्ल्यूडीजी १५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात फवारावे. तसेच ५% निंबोळी अर्क किंवा १५०० पीपीएम अॅझेडिरेक्ट्रिन ५० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करणेही सुचवले आहे.
तालुकानिहाय पावसाचे चित्र
आत्तापर्यंत नगर तालुक्यात १७७ मिमी, पारनेर १७०, श्रीगोंदे १९०, कर्जत २३२, जामखेड २२८, शेवगाव १५३, पाथर्डी १६०, नेवासे १३३, राहुरी १४०, संगमनेर १५५, अकोले २६०, कोपरगाव १३६, श्रीरामपूर १०८ आणि राहता तालुक्यात १४८ मिमी पाऊस झाला आहे. हा पाऊस सर्वच तालुक्यांत सरासरीपेक्षा कमी असून पिकांच्या वाढीवर त्याचा प्रतिकूल परिणाम होत आहे.








