अहिल्यानगर जिल्ह्यात वाढत्या दरोडे, घरफोडी आणि रस्त्यावरच्या लुटीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून विशेष गस्त आणि गुप्त कारवाया सुरू आहेत. अशाच एका कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेने तालुक्यातील मदडगाव शिवारात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीवर छापा टाकत चार संशयितांना ताब्यात घेतले. या कारवाईदरम्यान तीन जण अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पसार झाले. पकडलेल्या आरोपींकडून शस्त्रास्त्रे आणि इतर साहित्य असा सुमारे ३७ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गुप्त माहितीवरून पोलिसांची कारवाई
जिल्ह्यातील गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला नियमित गस्त ठेवून संशयित हालचालींवर लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले होते. या सूचनांनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक गस्त घालत होते.
पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे यांच्यासह गणेश लोंढे, लक्ष्मण खोकले, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, बाळासाहेब खेडकर, मनोज साखरे, प्रशांत राठोड आणि सुनील मालणकर या अंमलदारांचा समावेश असलेले पथक दरोडा प्रतिबंधक मोहिमेअंतर्गत परिसरात गस्त करत होते.
पाण्याच्या टाकीजवळ संशयास्पद हालचाली
मंगळवारी (१० मार्च) रात्री गस्तीदरम्यान पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की, सहा ते सात संशयित इसम दोन दुचाकींवर येऊन मदडगाव शिवारातील टाकळी काझी ते अंमळनेर मार्गावरील पाण्याच्या टाकीजवळ थांबले आहेत. हे सर्वजण शस्त्रसज्ज अवस्थेत असून दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
ही माहिती मिळताच पोलिसांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळ गाठले. संशयितांवर लक्ष ठेवत अंधारात दबा धरून बसल्यानंतर पोलिसांनी अचानक छापा टाकला.
चौघांना पकडण्यात यश, तिघे फरार
छापेमारीदरम्यान पोलिसांनी चार संशयितांना पकडण्यात यश मिळवले, तर इतर तीन जणांनी अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला. पकडलेल्या आरोपींची ओळख छगन चिंतामण काळे (वय ४३, रा. तळेवस्ती कडा, ता. आष्टी, जि. बीड), महावीर पंढरीनाथ भोसले (वय ३९, रा. शेरी खुर्द, ता. आष्टी, जि. बीड), कदम चिंचावन काळे (वय ३५, रा. तळेवस्ती) आणि इदगर गारमन चव्हाण (वय ३८, रा. शेरी खुर्द) अशी झाली आहे.
तर प्रवीण हबाजी भोसले, प्रफुल्ल हबाजी भोसले (दोघे रा. पिंपरखेड, ता. आष्टी, जि. बीड) आणि संतोष उर्फ सिंधुशा सुर्यभान काळे (रा. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) हे तिघे संशयित घटनास्थळावरून पसार झाले असल्याचे पोलिसांनी सांगितले.
शस्त्रास्त्रे आणि साहित्य जप्त
पोलिसांनी पकडलेल्या संशयितांची झडती घेतली असता त्यांच्याकडून दरोड्यासाठी वापरण्यात येणारी शस्त्रे आणि साहित्य जप्त करण्यात आले. यात तलवार, सत्तूर, लोखंडी कटावणी, मिरची पूड तसेच मोबाईल फोन यांचा समावेश आहे. या सर्व साहित्याची एकूण किंमत सुमारे ३७ हजार ९०० रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
आरोपींचा गुन्हेगारी इतिहास
पोलिस तपासात पकडलेल्या आरोपींपैकी छगन चिंतामण काळे याचा गुन्हेगारी इतिहास समोर आला आहे. त्याच्याविरुद्ध यापूर्वी अहिल्यानगर, बीड आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये दरोडा, घरफोडी आणि इतर गंभीर गुन्ह्यांचे एकूण सात गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.








