Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्यातील ऐतिहासिक २५० वर्षांचा राजवाडा पडझडीच्या उंबरठ्यावर

Author Picture
By Vaishnavi Swami Published On: August 31, 2025

Ahilyanagar News : पारनेर तालुक्यातील जामगाव हे गाव फक्त नैसर्गिक सौंदर्यामुळेच नव्हे, तर येथील अडीचशे वर्षांचा इतिहास सांगणाऱ्या राजवाड्यामुळेही ओळखले जाते. परंतु काळाच्या ओघात या वारशाची झालेली पडझड पाहून इतिहासप्रेमी व स्थानिक लोकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.

पानिपत युद्धानंतर मराठा साम्राज्यात महत्त्वाचे स्थान मिळवलेल्या महादजी शिंदे यांनी १७व्या शतकाच्या उत्तरार्धात (इ.स. १६६५ ते १६८० दरम्यान) या भव्य वाड्याची उभारणी केली. मजबूत दगडी तटबंदी, विशाल बुरुज, दोन अंगणे, दुमजली बांधकाम आणि अंगणातील मंदिर ही याची वैशिष्ट्ये होती. त्या काळातील शौर्य, सामर्थ्य आणि वास्तुकलेची झलक या इमारतीत आजही दिसून येते.

भव्यतेचा नमुना असलेला हा वाडा आज मात्र जिर्णावस्थेत आहे. छतावरील दगडी बांधकाम कोसळू लागले आहे, भिंतींना भेगा पडल्या आहेत आणि बुरुजांवरील रचना उध्वस्त होत आहेत. जर तातडीने दुरुस्ती व देखभाल करण्यात आली नाही, तर हा वारसा कायमचा लुप्त होईल, अशी भीती इतिहासतज्ज्ञ व्यक्त करतात.

राजवाड्याभोवती एकेकाळी २११ एकर शेती होती. मात्र पाण्याची योग्य व्यवस्था न झाल्याने येथील शेती ओसाड पडली. गावाजवळील भांडगाव तलावात वर्षभर मुबलक पाणी साठते, पण ते शेतीसाठी वापरले गेले नाही. जर सिंचनाची सुविधा उपलब्ध झाली, तर या परिसरात शेतीसह कृषी पर्यटनाचा नवा मार्ग खुला होऊ शकतो.

डोंगररांगेच्या कुशीत वसलेला हा राजवाडा पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. आजही अनेक पर्यटक या ऐतिहासिक वास्तूचे दर्शन घेण्यासाठी जामगावला येतात. जर येथील शेतीला पाणीपुरवठा केला, तर कृषी पर्यटनाचा विकास होऊन स्थानिक युवकांसाठी रोजगारनिर्मिती होऊ शकेल.

सन १९५५ मध्ये हा वाडा आणि साडेपाचशे एकर जमीन रयत शिक्षण संस्थेला दान स्वरूपात देण्यात आली. यापैकी तटबंदीच्या आत ८६ एकर जमीन असून, उर्वरित क्षेत्र बाहेर आहे. त्यातील काही जमीन संस्थेला मिळाली, तर काही भाग कुळांना सुपूर्त करण्यात आला. आजही संस्था या वारशाचे मालकी हक्क जपत असली तरी त्याच्या देखभालीसाठी मोठ्या प्रमाणात निधीची गरज आहे.

जामगावचा राजवाडा हा केवळ दगडी बांधकाम नाही, तर मराठा सामर्थ्य, संस्कृती आणि इतिहासाची साक्ष आहे. स्थानिक ग्रामस्थ, शासन व संस्था यांनी एकत्र येऊन या वारशाचे जतन केले, तर भविष्यात हे स्थळ ऐतिहासिक पर्यटनासाठी एक महत्त्वाचे केंद्र ठरू शकते.

अहिल्यानगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा आणि आमचे फेसबुक पेज लाईक करा