Ahilyanagar News : अहिल्यानगरमध्ये लग्न समारंभातच तुफान हाणामाऱ्या, वऱ्हाडी लग्नमंडपातून थेट रुग्णालयात

Author Picture
By Vaishnavi Swami Published On: June 29, 2025

देवळाली प्रवरा : राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथील श्रीरामपूर रोड लगत असलेल्या एका कार्यालयात आज (दि.२९) रविवारी विवाह समारंभात तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली. वधू पक्षातील काही तरुणांनी वर पक्षातील तरुणांची येथेच्छा धुलाई केल्याने पाच ते सहा तरुणांना लग्नमंडपातून थेट रुग्णालयात उपचारासाठी दाखल करावे लागले.

वरपक्ष आणि वधू पक्षातील तरुणांत किरकोळ कारणातून जोरदार हाणामारी झाली. या कारणाने वर पक्षातील चार ते पाच तरुणांना लग्न मंडपातून थेट रूग्णालयात दाखल करावे लागले आहे.

राहुरी तालुक्यातील एका गावातील लग्न समारंभ राहुरी फॅक्टरी येथील एका कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. या लग्न समारंभात नगरवरून वऱ्हाडी आले होते. या लग्नाची मुलीकडच्या मंडळींकडून जोरदार तयारी सुरू होती. ठरल्याप्रमाणे रविवारी लग्न सोहळा पार पडला. मात्र यावेळी वधू पक्षातील तरुण आणि वर पक्षातील काही तरुण यांच्यात वाद झाला. सुरूवातीला हा वाद किरकोळ होता. नंतर या वादाचं रूपांतर हाणामाऱ्यात झाले.

लग्नाला आलेल्या पाहुण्यांनी हा वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र नगरहून आलेल्या वऱ्हाडातील तरुणांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे हा वाद चिघळला. हा वाद इतका वाढला की लग्न मंडपाला चक्क युद्धाच्या छावणीचं रूप आलं. शाब्दिक बाचाबाची थेट हाणामारी होईपर्यंत पुढे गेली.

वधू पक्षातील तरुणांनी वर पक्षातील काही तरुणांना लग्न मंडपातून थेट रुग्णालयात दाखल करे पर्यंत मारहाण केली. वर पक्षातील चार ते पाच जणांवर राहुरी फॅक्टरी येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

अहिल्यानगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा आणि आमचे फेसबुक पेज लाईक करा