Ahilyanagar News : राहाता तालुक्यातील लोणी बुद्रुक येथे गेल्या दोन महिन्यांपासून पिंजऱ्याला हुलकावणी देणाऱ्या बिबट्याला अखेर जेरबंद करण्यात यश आले.
लोणी बुद्रुक, म्हस्के वस्ती येथील माजी मंत्री व जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक आण्णासाहेब म्हस्के पाटील यांच्या शेजारील शेतात लावलेल्या पिंजऱ्यात सुमारे ९ ते १० वर्ष वयाची मादी बिबट्या अडकली. वनविभाग व प्राणीमित्र यांच्या संयुक्त प्रयत्नातून ही कारवाई पार पडली.
गेल्या काही महिन्यांपासून दोन बिबट्यांचा मुक्त संचार वाढल्याने परिसरातील पाळीव कुर्त्यांचा फडशा पाडला जात होता. त्यामुळे डॉ. प्रमोद म्हस्के पाटील यांनी वनविभागाकडे पिंजऱ्याची मागणी केली होती मृत शेळी पिंजऱ्यात भक्ष म्हणून ठेवण्यात आली. संध्याकाळी
साडेसात वाजता सकाळची शिकार शोधत आलेला बिबट्या पिंजऱ्यात शिरला आणि जेरबंद झाला. त्या क्षणी पिंजऱ्याचा दरवाजा बंद झाल्याचा मोठा आवाज होताच कामगारांना बिबट्या गुरगुरण्याचा आवाज ऐकू आला.
तात्काळ रमेश घोलप यांनी प्राणीमित्र विकास म्हस्के यांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच प्राणीमित्रांनी अहील्यानगरचे उपवनसंरक्षक अधिकारी धर्मवीर शालविठ्ठल, सहाय्यक उपवनसंरक्षक गणेश मिसाळ, वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश रोडे, वनरक्षक प्रतिक गजेवर यांना कळविले. ते घटनास्थळी
पोहोचून पंचनामा करून पिंजरा हलविण्याची प्रक्रिया पार पाडली. या वेळी माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील, डॉ. नानासाहेब म्हस्के पाटील उपस्थित होते. बिबट्या जेरबंद झाल्याची बातमी पसरताच बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.
ही गर्दी पांगवण्यासाठी प्रकाश दिघे, भारत म्हस्के, अजय बोधक, रमण म्हस्के, प्रविण विखे, भुषण म्हस्के, गोकुळ म्हस्के, अर्जुन विखे, मधुकर म्हस्के, एकनाथ म्हस्के, अजित म्हस्के, निलेश म्हस्के, अरुण म्हस्के, सुधीर कडू, अनिल म्हस्के, संदीप म्हस्के, प्रभाकर म्हस्के, दत्तू म्हस्के, डॉ. मुसळे यांनी मदत केली.








