Ahilyanagar News : प्रेमसंबंधातून खून; दोन साथीदारांनंतर तिसरा आरोपीही पोलिसांच्या ताब्यात

Author Picture
By Ahilyanagar Breaking Published On: August 23, 2025

Ahilyanagar News : शेवगाव तालुक्यातील मुंगी शिवारात १२ ऑगस्ट रोजी सापडलेल्या तरुणाच्या खून प्रकरणात फरार असलेल्या आरोपीस अखेर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने प्रवरा संगम (ता. नेवासा) येथे जेरबंद केले. अफरोज सुलतान खान (४५, रा. कटकट गेट, छत्रपती संभाजीनगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून, खून प्रकरणातील दोन साथीदारांना पोलिसांनी यापूर्वीच ताब्यात घेतले होते.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, १२ ऑगस्ट रोजी मुंगी गावाजवळील गोदावरी नदीपात्रालगत शेताच्या कडेला एका ३० वर्षीय अनोळखी पुरुषाचे प्रेत आढळले होते. या घटनेनंतर शेवगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. तपासात मृत्युप्रकरणामागे प्रेमसंबंधातून निर्माण झालेल्या वादाचा धागा पुढे आला.

या प्रकरणात दुर्गेश मदन तिवारी (रा. वडोद, ता. खुलताबाद, जि. छ. संभाजीनगर) आणि भारती रविंद्र दुबे (रा. कॅनॉट प्लेस, सिडको, छ. संभाजीनगर) या दोघांना पोलिसांनी १८ ऑगस्ट रोजी अटक केली होती. मात्र त्यांचा तिसरा साथीदार अफरोज खान गुन्ह्यानंतर पसार झाला होता.

अफरोज खानचा शोध घेण्यासाठी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक नेमण्यात आले. या पथकात पोउपनि. राजेंद्र वाघ, पोलिस अंमलदार सुरेश माळी, बाळासाहेब नागरगोजे, बाळासाहेब गुंजाळ, बाळासाहेब खेडकर, रमिझराजा आतार, सारिका दरेकर आणि भगवान धुळे यांचा समावेश होता.

गुप्त बातमीदार आणि कौशल्यपूर्ण शोध मोहिमेद्वारे पोलिसांना अफरोज खान प्रवरा संगम येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पथकाने सापळा रचून २३ ऑगस्ट रोजी त्याला जेरबंद केले. चौकशीत त्याने साथीदारांसह खुनाचा गुन्हा केल्याची कबुली दिली. दरम्यान पुढील तपास शेवगाव पोलिसांकडे देण्यात आला आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा आणि आमचे फेसबुक पेज लाईक करा