Ahilyanagar News : केडगाव परिसरात जुगार अड्ड्यांविरोधात कोतवाली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. लिंक रोडवरील शेटे मळा परिसरात कडुनिंबाच्या झाडाखाली सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकून ९ जणांना ताब्यात घेण्यात आले असून, सुमारे ६ लाख ७ हजार ४९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
४ जुलै सायंकाळी अड्ड्यावर छापा
ही कारवाई ४ जुलै रोजी संध्याकाळी ६ वाजता करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने ही यशस्वी कारवाई केली. पोलीस उपनिरीक्षक कृष्णकुमार सेदवाड आणि त्यांच्या पथकाने लिंक रोडवरील डांबरी रस्त्यालगत झाडाखाली सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा मारला.
तिरट जुगाराचे साहित्य, मोबाईल, वाहनांसह मोठा मुद्देमाल जप्त
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींकडून तिरट जुगाराचे साहित्य, ८ मोबाईल फोन, एक अल्टो चारचाकी कार, ६ मोटारसायकली आणि नगदी रक्कम असा एकूण ६,०७,४९० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात पोलीस अंमलदार महेश पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नऊ आरोपींविरोधात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपास सुरूच – गुन्हे शोध पथकाची सजग कारवाई
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कृष्णकुमार सेदवाड करीत असून, कारवाईदरम्यान पोलीस अंमलदार बाळकृष्ण दौंड, विशाल दळवी, सलीम शेख, विनोद बोरगे, विक्रम वाघमारे, सत्यजीत शिंदे, अमोल गाडे, अतुल काजळे, महेश पवार, शिरीष तरटे, सचिन लोळगे, दत्तात्रय कोतकर, प्रतिभा नागरे आणि दक्षिण मोबाईल सेलचे राहुल गुंडु यांचे विशेष योगदान लाभले.
जुगार अड्ड्यांना आळा बसणार?
पोलिसांच्या या कारवाईमुळे शहरातील इतर गुप्त जुगार अड्ड्यांवर दबाव निर्माण होण्याची शक्यता आहे. यापुढेही अशा प्रकारच्या कारवाया सुरू राहतील का, याकडे क्रीडाप्रेमींसह नागरीकांचे लक्ष लागून राहिले आहे.








