लोकन्यायालयाच्या माध्यमातून प्रलंबित प्रकरणांचा मोठ्या प्रमाणावर निपटारा
जामखेड येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात शनिवारी (१४ मार्च) आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोकन्यायालयात विविध प्रकारच्या प्रलंबित प्रकरणांचा मोठ्या प्रमाणावर निपटारा करण्यात आला. न्यायालयीन तसेच दाखलपूर्व अशा एकूण ३ हजार २४६ प्रकरणांवर या लोकन्यायालयात तोडगा काढण्यात आला. न्यायालयीन प्रक्रियेत दीर्घकाळ प्रलंबित असलेली अनेक प्रकरणे सामोपचाराने मिटविण्यात आली.
या लोकन्यायालयात न्यायालयात सुरू असलेली ५६ प्रकरणे निकाली काढण्यात आली, तर ग्रामपंचायती, नगरपरिषद, बँका आणि पतसंस्थांशी संबंधित दाखलपूर्व ३ हजार १९० प्रकरणांवरही तोडगा काढण्यात आला. त्यामुळे संबंधित पक्षकारांना दीर्घकालीन न्यायालयीन प्रक्रियेपासून दिलासा मिळाला.
कौटुंबिक वादावर सामोपचाराने मार्ग
या लोकन्यायालयात आलेल्या एका कौटुंबिक प्रकरणाने विशेष लक्ष वेधले. पती-पत्नीमधील मतभेदांमुळे उद्भवलेल्या वादामुळे हे प्रकरण न्यायालयात पोहोचले होते. काही कारणांमुळे दोघांमध्ये मतभेद निर्माण झाल्याने २०२५ साली ते वेगळे राहू लागले होते. त्यांना तीन वर्षांची मुलगी असून विवाहिता मुलीसह माहेरी राहत होती.
या प्रकरणात पत्नीने पोटगीसाठी न्यायालयात दावा दाखल केला होता. त्यामुळे दोन्ही कुटुंबांमध्ये दुरावा वाढत गेला आणि प्रकरण न्यायालयीन प्रक्रियेत अडकले.
समुपदेशनातून दाम्पत्याचा निर्णय बदलला
राष्ट्रीय लोकन्यायालयात हे प्रकरण आल्यानंतर न्यायाधीश यू. ए. भोसले आणि न्यायाधीश ए. बी. फंड यांनी दोन्ही पक्षकारांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले. त्यानंतर पती-पत्नीला समुपदेशन देत त्यांच्यात संवाद घडवून आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. संसाराचे महत्त्व, कुटुंबातील नातेसंबंध आणि मुलीच्या भविष्यासंदर्भात सकारात्मक चर्चा करण्यात आली.
या प्रक्रियेनंतर दोन्ही बाजूंमध्ये समेटाचा मार्ग निघाला आणि विवाहिता आपल्या तीन वर्षांच्या मुलीसह पुन्हा सासरी राहण्यास तयार झाली. त्यामुळे पोटगीसंदर्भातील प्रकरण सामोपचाराने मिटले.
वकिलांची समन्वयक भूमिका
या प्रकरणात दोन्ही बाजूंतील वकिलांनीही समन्वय साधण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. अर्जदाराच्या बाजूने अॅड. जे. एम. कोल्हे आणि अॅड. हर्षल डोके यांनी मार्गदर्शन केले. याशिवाय अॅड. अमीर पठाण, अॅड. कल्पेश गायकवाड आणि साद शेख यांनीही या प्रक्रियेत सहकार्य केले. न्यायाधीश आणि वकिलांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे हे प्रकरण सामोपचाराने मार्गी लागले.
चिमुकलीला मिळाले पुन्हा दोन्ही पालकांचे प्रेम
या तडजोडीनंतर तीन वर्षांच्या मुलीला पुन्हा आई-वडिलांचे एकत्रित छत्र मिळाले. कुटुंबातील मतभेद मिटून दाम्पत्याने पुन्हा एकत्र संसार सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने न्यायालयीन वातावरणात समाधान व्यक्त करण्यात आले.
राष्ट्रीय लोकन्यायालयाच्या माध्यमातून केवळ प्रकरणांचा निपटारा होत नाही, तर अनेक वेळा विखुरलेली कुटुंबे पुन्हा एकत्र येण्याची संधी मिळते, असे चित्र या प्रकरणातून दिसून आले.








