Ahilyanagar News : अहिल्यानगर शहरातून महिंद्रा स्कॉर्पिओ ची चोरी; पोलिसांत गुन्हा दाखल

Author Picture
By Vaishnavi Swami Published On: August 23, 2025

Ahilyanagar News : अहिल्यानगर शहरात सलग कार चोरीच्या घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. केडगावमधील भुषणनगर परिसरातून टाटा हॅरीयर कार चोरीला गेल्याची घटना ताजी असतानाच आता सावेडी उपनगरातून महिंद्रा स्कॉर्पिओ चारचाकी वाहन चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला आहे.

ही घटना कुष्ठधाम रोडवरील भिस्तबाग चौकाजवळील महेक अपार्टमेंटसमोर घडली. या प्रकरणी दिनेश अशोक डेगला (वय ३६, रा. महेक अपार्टमेंट, कुष्ठधाम रोड) यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

फिर्यादी यांच्या माहितीनुसार, त्यांनी त्यांची काळ्या रंगाची महिंद्रा स्कॉर्पिओ (क्र. एमएच १६ डीएस ५३२६) दिनांक २० ऑगस्ट रोजी रात्री अपार्टमेंटसमोर रस्त्याच्या कडेला पार्क केली होती.

परंतु २२ ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजता उठून पाहिले असता गाडी जागेवर दिसली नाही. परिसरात शोध घेतला तरीही वाहनाचा काही मागमूस न लागल्याने त्यांनी पोलिसांत धाव घेतली.

तोफखाना पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध बीएनएस कलम ३०५ (बी) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास सुरू असून या सलग चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा आणि आमचे फेसबुक पेज लाईक करा