Ahilyanagar News : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचा अंतरवली सराटी येथून मुंबईच्या आझाद मैदानाकडे निघालेला मोर्चा २७ ऑगस्ट रोजी अहिल्यानगर जिल्हा हद्दीतून जाणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने अवजड व मालवाहतूक वाहनांसाठी पर्यायी मार्ग निश्चित केले आहेत.
मोर्चाचा मार्ग घोटण, शेवगाव, मिरी, माका, पांढरीपुल, अहिल्यानगर बायपास, नेप्ती चौक, आळेफाटा या ठिकाणांतून जात जुन्नर (शिवनेरी किल्ला) येथे मुक्कामी पोहोचणार आहे. मोर्चादरम्यान मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी व अपघात होण्याचा धोका लक्षात घेऊन प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून वाहतूक बदलण्याचे आदेश दिले आहेत.
प्रशासनाने जाहीर केलेले पर्यायी मार्ग
छत्रपती संभाजीनगर → नेवासा फाटा → पांढरीपुल → अहिल्यानगर शेडी बायपास मार्गे जाणारी वाहने
नेवासा फाटा – श्रीरामपूर – राहुरी फॅक्टरी – विळद बायपास मार्गे वळवली जातील.
अहिल्यानगर → एमआयडीसी शेडी बायपास → पांढरीपुल मार्गे जाणारी वाहने
विळद बायपास – राहुरी फॅक्टरी – श्रीरामपूर – नेवासा फाटा मार्गे जातील.
शेवगाव → मिरी – माका मार्गे पांढरीपुलकडे जाणारी वाहने
नेवासा फाटा मार्गे किंवा शेवगाव – कुकाणा – तिसगाव मार्गे वळवली जातील.
पांढरीपुल → मिरी – माका मार्गे शेवगावकडे जाणारी वाहने
जेऊर – कोल्हार घाट – चिचोंडी मार्गे वळवली जातील.
आपत्कालीन सेवांना सूट
या आदेशातून शासकीय वाहने, मोर्चातील वाहने, अॅम्ब्युलन्स, अग्निशमन दलाची वाहने तसेच स्थानिक प्रशासनाने अत्यावश्यक कारणास्तव परवानगी दिलेली वाहने वगळण्यात आली आहेत.








