अहिल्यानगरमध्ये मोठा आर्थिक परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका तरुणाची तब्बल ५ लाख ९८ हजार ९९९ रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. व्यावसायिक गुंतवणुकीच्या नावाखाली ही रक्कम स्वीकारण्यात आली; मात्र नफा तर दूरच, गुंतवलेली मूळ रक्कमही परत न मिळाल्याने तरुणाने पोलिसांकडे धाव घेतली.
या प्रकरणी अहिल्यानगर सायबर पोलीस ठाण्यात गुरुवारी, १८ जून रोजी तीन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणूक झालेल्या ३० वर्षीय तरुणाने याबाबत फिर्याद दिली आहे.
केरळमधील तीन जणांविरुद्ध गुन्हा
सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात विनीत व्ही., नवीन एस. आणि इलयाराजा ए. या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे तिघेही नेडुमंगड, तालुका नेडुमंगड, जिल्हा तिरुअनंतपुरम, केरळ येथील रहिवासी असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
फिर्यादी एचक्यू एसीसीएस, अहिल्यानगर येथे नोकरीला आहेत. संशयितांनी फिर्यादीशी संपर्क साधून व्यावसायिक गुंतवणुकीची ऑफर दिली. गुंतवणूक केल्यास मोठा आर्थिक फायदा आणि भरघोस परतावा मिळेल, असे आश्वासन देत त्यांचा विश्वास संपादन करण्यात आला.
विविध माध्यमांतून घेतली रक्कम
संशयितांच्या आश्वासनांवर विश्वास ठेवून फिर्यादीने विविध माध्यमांतून एकूण ५ लाख ९८ हजार ९९९ रुपये दिले. सुरुवातीला मोठ्या नफ्याचे चित्र रंगवण्यात आले. मात्र ठरल्याप्रमाणे कोणताही परतावा मिळाला नाही.
गुंतवलेली रक्कम परत मागितल्यानंतर संशयितांकडून टाळाटाळ सुरू झाली. सतत सबबी दिल्या जात असल्याने आणि पैसे परत मिळत नसल्याने आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले.
झिरो एफआयआरनंतर अहिल्यानगरमध्ये गुन्हा दाखल
ही घटना २८ नोव्हेंबर २०२५ रोजी घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणात राजस्थान राज्यातील बानसूर पोलीस ठाण्याकडून झिरो एफआयआर प्राप्त झाला होता. त्या अनुषंगाने अहिल्यानगर सायबर पोलीस ठाण्यात १८ जून २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.
सायबर फसवणुकीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर गुंतवणुकीच्या नावाखाली मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून नागरिकांना जाळ्यात ओढले जात असल्याचे या घटनेतून पुन्हा समोर आले आहे.
सायबर पोलिसांकडून तपास सुरू
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सागर ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. संशयितांनी फिर्यादीकडून रक्कम कोणत्या खात्यांमध्ये घेतली, व्यवहार कोणत्या माध्यमातून झाले आणि या फसवणुकीत आणखी कोणी सहभागी आहे का, याचा तपास सायबर पोलीस करत आहेत.








