अहिल्यानगरकरांनो सावधान! हवामान विभागाकडून जिल्ह्यात यलो अलर्ट जारी, मुसळधार पावसाची शक्यता

Author Picture
By Vaishnavi Swami Published On: July 26, 2025

अहिल्यानगर- जिल्ह्यातील काही भागांत शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. या पावसामुळे उशिरा सुरू झालेल्या खरीप हंगामातील पिकांना मोठा दिलासा मिळाला असून जमिनीत ओलावा निर्माण झाल्याने रोपवाटिका व उगम अवस्थेतील पिकांना संजीवनी मिळाली आहे. शेतकरी वर्गात यामुळे आशेचा किरण निर्माण झाला आहे.

हवामान खात्याचा इशारा

हवामान विभागाने आज शनिवारसाठी जिल्ह्यातील काही भागांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असून त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’ घोषित करण्यात आला आहे. यामुळे शहरी आणि ग्रामीण भागात नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नदीकाठच्या भागांतील नागरिकांसाठी सतर्कतेचा इशारा

पुणे, नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये होत असलेल्या पर्जन्यमानाचा परिणाम म्हणून भीमा, प्रवरा, गोदावरी, सीना आणि हंगा या प्रमुख नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. विशेषतः मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात कोतुळ परिसरातून मुळा नदीत विसर्ग सुरू झाल्याने नदीकाठच्या गावांमध्ये पूरपरिस्थिती उद्भवू शकते.

जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना दक्षतेचे आवाहन

सध्या सुरू असलेल्या धरणातील विसर्ग व संभाव्य पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना नदीकिनाऱ्यांपासून दूर राहण्याचे, अनावश्यक प्रवास टाळण्याचे व प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज असून संभाव्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत.


अशा हवामान परिस्थितीत नागरिकांनी सोशल मीडियावरुन मिळणाऱ्या अफवांपासून दूर राहून अधिकृत सूचनांवर विश्वास ठेवावा आणि गरज असल्यास नजीकच्या प्रशासन कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा आणि आमचे फेसबुक पेज लाईक करा