अहिल्यानगरमध्ये अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या गंभीर प्रकरणात विशेष पोक्सो न्यायालयाने कठोर निर्णय देत आरोपीस जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या निकालामुळे बालसुरक्षेच्या दृष्टीने न्यायालयाची ठाम भूमिका पुन्हा अधोरेखित झाली आहे.
आरोपीला विविध कलमांखाली दोषी ठरवत शिक्षा
युसुफ हमीद कुरेशी (वय ३४, रा. गाझीनगर, काटवन खंडोबा, अहिल्यानगर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. विशेष पोक्सो न्यायाधीश डॉ. यू. जे. मोरे यांनी भारतीय दंड संहितेतील विविध कलमांनुसार आरोपीला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. तसेच आरोपीवर २२ हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असून, ही रक्कम पीडितेला देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
आमिष दाखवून अत्याचार केल्याची घटना
घटनेचा तपशील असा की, ऑगस्ट २०१५ मध्ये पीडित मुलगी तिच्या घराजवळ खेळत असताना आरोपीने तिला खाऊचे आमिष दाखवून जवळच्या एका मंगल कार्यालयात नेले. त्या ठिकाणी आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. संबंधित आरोपी त्या वेळी त्या ठिकाणी पहारेकरी म्हणून काम करत होता. घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी पीडितेच्या आईने कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.
तपास आणि साक्षीदारांचे महत्त्वपूर्ण योगदान
या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन यांनी केला आणि त्यानंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. खटला विशेष पोक्सो न्यायालय तसेच जिल्हा न्यायाधीश न्यायालय क्रमांक ६ येथे चालला. या दरम्यान एकूण १८ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. यात पीडिता, तिची आई, वैद्यकीय अधिकारी आणि रासायनिक विश्लेषक यांच्या साक्षी निर्णायक ठरल्या.
न्यायालयाचे निरीक्षण आणि नोंद
निकाल देताना न्यायालयाने बालकांच्या सुरक्षिततेवर भर देत महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले. पीडित मुलीचा जन्म स्वातंत्र्यदिनास झाला असून, प्रत्येक बालिकेला सुरक्षित आणि निर्भय वातावरणात वाढण्याचा अधिकार आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले. मात्र आरोपीच्या कृत्यामुळे तिच्या या मूलभूत हक्कांवर आघात झाल्याचे नमूद करण्यात आले.
सरकार पक्षाची बाजू प्रभावीपणे मांडली
या प्रकरणात सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अॅड. राजेश आर. त्रिमुखे यांनी बाजू मांडली. त्यांना सहायक पोलीस निरीक्षक संजय चव्हाण तसेच अंमलदार आर. डी. आडसुळ, याकुब सय्यद आणि सचिन डमाळे यांनी सहाय्य केले.








