अहिल्यानगर- शहरातील प्रोफेसर चौक येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यासाठी उभारण्यात आलेल्या चौथऱ्याचे काम पूर्ण झाले असूनही अजूनपर्यंत पुतळा विराजमान करण्यात आलेला नाही.
या ठिकाणी लवकरात लवकर छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा बसविण्यात यावा, अशी मागणी अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.
या वेळी महिला आघाडीच्या जिल्हाअध्यक्ष सुरेखाताई सांगळे, जिल्हा अध्यक्ष रावसाहेब काळे, दत्ताभाऊ वामन, मीनाक्षी धामणे, प्रतिभा भिसे, शिवाजी वेताळ, भगवान काटे, श्रीधर शेलार, विनोद साळवे, पिंटू पवार आदी उपस्थित होते. निवेदनात म्हटले की, प्रोफेसर चौकात उभारण्यात आलेल्या चौथऱ्याचे संपूर्ण काम काही महिन्यांपूर्वी पूर्ण झाले असून पुतळा विराजमान करण्यासाठी लागणारी प्रक्रिया रखडली आहे.
महापालिकेच्या कामकाजातील दिरंगाईमुळे काम अजूनही प्रलंबित आहे. या कामाची मुदतही संपली असून, नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांनी लक्ष घालून मनपा प्रशासनाला आवश्यक ते निर्देश द्यावेत. छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा लवकरात लवकर विराजमान करावा, अशी मागणी छावा संघटनेतर्फे करण्यात आली.








