भंडारदरा- अकोले तालुक्यातील महत्त्वाचे पर्यटन स्थळ असणाऱ्या भंडारदरा धरणावर स्वातंत्र्य दिनी तसेच वीकेंडला होणारी पर्यटकांची गर्दी लक्षात घेता एकेरी वाहतुकीचा मार्ग अवलंबण्यात आला असल्याची माहिती राजूर पोलिसांनी दिली आहे. भंडारदऱ्याला जाणाऱ्या पर्यटकांनी या एकेरी वाहतुकीच्या मार्गाचा अवलंब करावा, असे आवाहन राजूर पोलिसांनी केले आहे.
अकोले तालुक्यातील भंडारदरा हे निसर्गरम्य पर्यटन स्थळ असून दरवर्षी वर्षा ऋतूमध्ये येथे हजारो पर्यटक भेट देतात. भंडारदराच्या पर्यटन क्षेत्रामध्ये भंडारदरा धरण, कळसुबाई शिखर, आशिया खंडातील सर्वात खोल सांदणदरी, रतनवाडीचे अमृतेश्वर मंदिर, रंधा धबधबा, वसुंधरा फॉल, नान्ही फॉल, बाहुबली धबधबा, नेकलेस फॉल, घाटघर येथील कोकणकडा अशी अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. पावसाळ्यात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होते. या काळात वाहतूक कोंडीची समस्या उद्भवते. सध्या भंडारदरा धरण भरत असून अभयारण्यात धबधब्यांची मालिका सुरू आहे.
स्वातंत्र्यदिनी येथे मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता गृहीत धरून पर्यटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी व वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अहमदनगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी एकेरी वाहतुकीचा निर्णय घेतला असून तसे आदेश राजुर पोलिसांना देण्यात आले आहेत.
रंधा धबधबा येथून भंडारदरा धरणाकडे जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. राजुर, संगमनेर भागातून येणाऱ्या पर्यटकांसाठी वाकी फाटा/वारंघुशी फाटा, चिचोंडी फाटा, हॉटेल यश, शेंडी, भंडारदरा धरण हा मार्ग निश्चित करण्यात आला आहे. नाशिक व मुंबईकडून येणाऱ्या पर्यटकांसाठी वारंघुशी फाटा, चिचोंडी, हॉटेल यश, शेंडी, भंडारदरा धरण असा मार्ग राहील. पर्यटकांना रंधा धबधबामार्गे बाहेर पडता येणार आहे.
हा एकेरी वाहतुकीचा मार्ग १५ ते १७ ऑगस्ट या कालावधीत अवलंबण्यात येणार असल्याची माहिती राजुर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक सरोदे यांनी दिली आहे. पर्यटकांनी दिलेल्या मार्गानुसारच भंडारदरा पर्यटनाचा आनंद घ्यावा, असे आवाहन राजुर पोलिसांनी केले आहे.
स्वातंत्र्यदिनी एकेरी वाहतुकीचा अवलंब करण्यात आला असला तरी या निर्णयाचा फटका भंडारदरा परिसरातील व्यावसायिकांना बसत आहे. प्रत्यक्ष कोणी बोलत नसले तरी एकेरी वाहतुकीला विरोध असल्याचे दिसून येत आहे. भंडारदरा धरणाजवळील सांडव्याजवळ मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढविला तर भंडारदऱ्याचे पर्यटन शांततेत पार पडेल. त्यामुळे राजुर पोलिसांनी धरणाच्या सांडव्याजवळ अधिक लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे.
पूर्वी प्रत्येक वर्षी या काळात एक दंगल पथक नेमले जात होते. त्यावेळी पर्यटकांना कोणतीही अडचण येत नव्हती. त्याचप्रकारे पुन्हा एकदा अंमलबजावणी झाली तर भंडारदऱ्याचे पर्यटन सुव्यवस्थित होण्यास मदत होईल, असे शेंडीचे माजी सरपंच दिलीप भांगरे यांनी सांगितले.








