श्रीगोंदा- तालुक्यात श्रावण महिन्याचा समारोप होताच रविवारपासून शहर व ग्रामीण भागातील मटण व चिकन दुकानांवर प्रचंड गर्दी उसळल्याचे चित्र दिसून आले. शहरातील मुख्य बाजारपेठेत तसेच गावागावातील मटण-चिकन दुकानदारांकडे सकाळपासूनच ग्राहकांची मोठ्या रांगा लागल्या होत्या.
काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी वाढल्याचे दिसून आले. “श्रावणात व्रत-उपवास करून साधेपणाने जेवलो, पण आता महिनाभरानंतर पोटाला थोडा बदल हवा आहे. म्हणूनच मटण-चिकन घ्यायला आलोय,” असे ग्राहकाने सांगितले. दुकानदारांच्या चेहऱ्यावरही आनंद दिसून आला. महिनाभर विक्रीत घट झाल्यानंतर अचानक उसळलेल्या मागणीमुळे त्यांना दिलासा मिळाला. “गेल्या तीस दिवसांत फारशी विक्री झाली नाही, पण आजपासून विक्रीत चांगली तेजी आली आहे,” असे मटण विक्रेत्याने सांगितले.
दरम्यान, वाढत्या मागणीमुळे दरात थोडीशी वाढ झाली आहे. मात्र, उत्साहात ग्राहकांनी किंमतीकडे फारसे लक्ष न देता खरेदीला प्राधान्य दिले. ग्रामीण भागातील गावांतही हाच उत्साह पाहायला मिळाला. अनेक ठिकाणी मटणाचे हॉटेल्स, ढाबे येथे देखील ग्राहकांची गर्दी झाली होती. काही ठिकाणी मटण हाती मिळणेही कठीण झाले होते.
श्रावण महिना भगवान शंकराला समर्पित असून, या महिन्यात उपवास, पूजा आणि धार्मिक कार्यांना विशेष महत्त्व दिले जाते. श्रावण महिन्यात अनेक लोक उपवास करतात आणि भगवान शंकराची पूजा करतात. श्रावण महिन्यातील सोमवार श्रावणी सोमवार म्हणून ओळखले जातात. या दिवशी शंकराची विशेष पूजा केली जाते. पौराणिक मान्यतेनुसार श्रावणात व्रत केल्यामुळे आपले भविष्य खूप चांगले होते.
भगवान शंकराची आपल्यावर कृपादृष्टी राहते असा समज आहे. श्रवणातील व्रत केल्यामुळे आपल्या घरात सुख शांती नांदते असा समज आहे. श्रावण महिन्यात शिवलिंगावर पाणी, दूध, बेलपत्र, धतुरा, मध इत्यादी अर्पण करण्याची परंपरा आहे. विशेषतः सोमवारी उपवास करून भगवान शिवाची पूजा केल्याने मनोकामना पूर्ण होतात अशा धारणा आहे.








