बच्चू कडूंचा विखे पाटलांवर थेट हल्ला, ‘गुन्हे दाखल तरी अटक नाही’ म्हणत फटकारलं !

Author Picture
By Vaishnavi Swami Published On: June 17, 2025

प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष व माजी मंत्री बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन मागे घेतल्यानंतरही त्यांचा लढा थांबलेला नाही. सध्या ते रुग्णालयात उपचार घेत असतानाही राजकीय टीकाकारांना प्रत्युत्तर देण्यात ते मागे हटत नाहीत. त्यांच्या टीकास्त्रांचे लक्ष्य विशेषतः भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील ठरले आहेत.

विखे पाटलांवर घणाघाती आरोप

भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आंदोलनाच्या सुरुवातीस बच्चू कडूंवर टीका केली होती. यावर सुरुवातीला प्रहार पक्षाच्या प्रवक्त्यांनी उत्तर दिलं, पण आता खुद्द कडूंनी आक्रमक पवित्रा घेत विखे पाटलांवर थेट आरोपांचा वर्षाव केला आहे. त्यांनी मंत्री विखेंविरोधात न्यायालयीन प्रकरणांची आठवण करून दिली आणि आरोप केला की, “न्यायालयाने गुन्हा दाखल केला असतानाही, राजकीय प्रभावामुळे कोणतीही अटक होत नाही.”

ऊस दरावरून विखेंच्या प्रवरा साखर कारखान्यावर टीका

कडू यांनी प्रवरा साखर कारखान्याचा संदर्भ देत म्हटलं, “जिथे ३४०० रुपये दर शक्य आहे, तिथे केवळ ३००० रुपये देण्याची तयारी दाखवली जाते. बाहेरील शेतकऱ्यांना कमी दर देणाऱ्या विखेंना शेतकऱ्यांबाबत बोलण्याचा अधिकार नाही.” त्यांच्या मते, विखेंची भूमिका नेहमीच पक्षपाती व शेतकऱ्यांच्या विरोधात राहिली आहे.

‘पराभवातून बाहेर पडा’ टीकेला रोखठोक उत्तर

विखे पाटलांनी कडूंना त्यांच्या निवडणूक पराभवाचा दाखला देत ‘जनतेसाठी काम करा’ अशी टीका केली होती. त्यावर बच्चू कडूंनी प्रत्युत्तर दिलं, “ते आमच्यावर टीका करण्याएवढे मोठे नाहीत. पराभव होण्यापूर्वीच आमच्यावर साडेतीनशे गुन्हे दाखल आहेत. आमच्याकडे इतकी माहिती व पुरावे आहेत की, ते दिले तर विखे पाटील बुजून जातील.”

शिर्डीतील भिकाऱ्यांच्या हत्येवरून सवाल

बच्चू कडूंनी विखे पाटलांना सवाल करत शिर्डीतील चार भिक्षुकांच्या मृत्यूचा मुद्दा उचलला. “शिर्डीत भिकारी नसतानाही चार जण मारले गेले, त्यावर साधं प्रतिक्रिया द्यावी असंही वाटलं नाही. असे लोक सामान्य माणसांच्या वेदना कशा समजून घेतील?” असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी विखे पाटलांच्या सामाजिक संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं.

अहिल्यानगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा आणि आमचे फेसबुक पेज लाईक करा