महाराष्ट्राच्या योगदानात बाळासाहेब थोरात यांचे मोठे योगदान, त्यांच्यासारखा मोहरा विधानसभेत नसणे ही मोठी खंत- खासदार संजय राऊत

Author Picture
By Vaishnavi Swami Published On: August 15, 2025

संगमनेर- तालुका आणि आसपासच्या ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलण्यात माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे योगदान लक्षणीय आहे. सहकार, ग्रामीण विकास, दूध व्यवसाय, कृषी क्षेत्रातील सुधारणा, शिक्षणाचा प्रसार आणि निळवंडे धरणाचे पाणी उपलब्ध करून देणे या माध्यमातून त्यांनी भागाला आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या बळकटी दिली. त्यांच्या नेतृत्वामुळे संगमनेर राज्याच्या विकास नकाशावर एक महत्त्वाचे केंद्र म्हणून उदयास आले.

राऊत यांचे मनोगत

डीग्रस येथे संत बुवाजी बाबा यांच्या आध्यात्मिक सोहळ्यात बोलताना खासदार संजय राऊत यांनी बाळासाहेब थोरात यांच्या कार्याचा गौरव केला. ते म्हणाले की, “थोरात साहेबांनी पाणी आणि शिक्षणाच्या माध्यमातून भागाला राज्यात अग्रक्रमावर आणले. जनतेसाठी सातत्याने काम करणारे असे नेतृत्व विधानसभेत नसणे ही महाराष्ट्रासाठी मोठी खंत आहे. त्यांच्या पराभवाला जनता कधीच न्याय देणार नाही.” राऊत यांनी दिल्ली आणि महाराष्ट्र दोन्ही स्तरांवर झालेल्या पराभवाबाबत खंत व्यक्त केली आणि “त्यांनी काय कमी केले होते?” असा थेट सवाल उपस्थित केला.

महाविकास आघाडीच्या काळातील कामगिरी

खासदार राऊत यांनी महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळाचा उल्लेख करताना सांगितले की, त्या काळात राज्य सरकारने उल्लेखनीय विकासकामे केली. या काळात थोरात यांनीही विकासाच्या अनेक योजनांची अंमलबजावणी करून ग्रामीण भागाला प्रगतीच्या मार्गावर नेले.

डिग्रस देवस्थानाचा बदललेला चेहरा

कार्यक्रमादरम्यान बोलताना बाळासाहेब थोरात यांनी डिग्रस देवस्थानावरील परिवर्तनाचा उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, “या देवस्थानावर शेकडो बकऱ्यांची बळी देण्याची जुनी परंपरा होती. परंतु संत नारायण गिरी महाराज यांच्या सप्ताहामुळे ही प्रथा थांबली आणि येथे आध्यात्मिक वातावरणाची नवी परंपरा सुरू झाली.”

भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग

या आध्यात्मिक सोहळ्यात परिसरातील लाखो भाविकांनी उपस्थित राहून श्रद्धा आणि एकतेचा संदेश दिला. व्यासपीठावर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, रणजीतसिंह देशमुख, महंत बुवाजी बाबा पुणेकर, उमाजी बाबा पुणेकर, बबन सांगळे, डॉ. जयश्रीताई थोरात, शंकर पाटील खेमनर, शिवसेनेचे अमर कतारी, संजय फड, पप्पू कानकाटे आदी मान्यवर उपस्थित होते.

अहिल्यानगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा आणि आमचे फेसबुक पेज लाईक करा