भंडारदरा- गेल्या काही दिवसांपासून पाणलोट क्षेत्रात पावसाची जोरदार बॅटींग सुरू असल्याने उत्तर नगर जिल्ह्याची जीवनदायीनी असलेले भंडारदरा धरण बुधवारी (दि.२०) पहाटे तीन वाजता ‘ओव्हरफ्लो’ झाले. धरणातून प्रवरा नदी पात्रात १२ हजार ९२१ क्युसेकचा विसर्ग सुरू आहे. नदीकाठच्या नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
दरम्यान जिल्ह्यात दोन दिवसांपासून रिमझिम पावसाने हजेरी लावल्याने पिकांना संजीवनी मिळाली आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासूनच भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसाचे आगमन झाले. त्याचवेळी सुरू झालेला पाऊस उघडण्याचे नावच घेत नव्हता.
त्यामुळे यंदा धरण जुलैच्या मध्यावरच भरते की काय? अशी शक्यता होती. मात्र, धरण भरण्यापूर्वीच पाणी पातळीवर नियंत्रण मिळविण्यासाठी धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडले गेले. दरम्यान, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात धरणाच्या पाणलोटात पावसाने विश्रांती घेतली. त्यामुळे स्वातंत्र्य दिनापूर्वी धरण भरू शकले नाही. असे धरण निर्मितीनंतर नवव्यांदा घडले आहे. त्यानंतर भंडारदरा धरणाच्या पाणलोटासह परिसरात पुन्हा पावसाने जोरदार बॅटिंग केली.
मंगळवारी सायंकाळी धरणाच्या पाणलोटात तुफान पाऊस कोसळला. त्यामुळे नवीन पाण्याची मोठी आवक होऊन भंडारदरा धरण बुधवारी पहाटे तीन वाजता ९८.७० टक्के भरले. त्यानंतर भंडारदरा धरण शाखेकडून धरण तांत्रिकदृष्ट्या भरल्याचे जाहीर केले. ११ हजार ३९ दशलक्ष घनफूट क्षमता असलेल्या भंडारदरा धरणात १० हजार ७०० दशलक्ष घनफूट पाणीसाठा ठेऊन अतिरिक्त पाणी प्रवरा नदी पात्रात १२ हजार ९२१ क्युसेक पाणी सोडले जात आहे.
निळवंडेत ९१, तर मुळा धरणात ८४ टक्के पाणीसाठा
कळसूबाई शिखरावरही जोरदार पाऊस असल्याने निळवंडे धरणामध्येही मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू असून लवकरच निळवंडे धरणही भरण्याच्या मार्गावर आहे. निळवंडे धरणाचा पाणीसाठा बुधवारी दुपारी ७ हजार ६२५दलघफू होता. धरण ९१.५५ टक्के भरले. निळवंडेतून प्रवरा नदी पात्रात ९ हजार ७२९ क्युसेक विसर्ग सोडला जात आहे. त्यामुळे प्रवरेला पूर येण्याची शक्यता आहे. भंडारदरा धरणाच्या पाणी पातळीवर पाटबंधारे विभागाचे अधिकारी योगेश जोर्वेकर यांच्यासह शाखाधिकारी प्रवीण भांगरे लक्ष ठेऊन आहेत. पाणलोटात सुरू असलेल्या पावसामुळे मुळा धरणातील पाणीसाठाही वाढत आहे. २६ हजार दशलक्ष घनफूट क्षमता असलेल्या मुळा धरणात २२ हजार ७५२ दलघफू पाणीसाठा झाला आहे. मुळा धरणातही ८४ टक्के पाणीसाठा झाला आहे.
गत चोवीस तासातील पाऊस
गत २४ तासामध्ये भंडारदरा येथे १०१ मिलीमीटर पावसाची नोंद असून घाटघर १६० मिमी, पांढरे १०५, वाकी १०२, तर सर्वात जास्त पावसाची नोंद रतनवाडी येथे १७० मिमी झाली.








