अहिल्यानगरमध्ये जास्तीचा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत उद्योजकाची तब्बल ८० लाखांची फसवणूक, गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

Author Picture
By Vaishnavi Swami Published On: July 22, 2025

अहिल्यानगर- येथील एका मोठ्या फसवणूक प्रकरणाने उद्योजकांमध्ये खळबळ उडवली आहे. रिजॉईस इव्हेंट ऑर्गनायझेशन या कंपनीने विमान आणि हॉटेल बुकिंग व्यवसायात गुंतवणूक करून जास्तीचा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत उद्योजक राजेश ब्रिजलाल बन्सल यांची ८० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले असून, एमआयडीसी पोलिसांकडून पुढील तपास केला जाणार आहे.

या प्रकरणातील फिर्यादी राजेश ब्रिजलाल बन्सल (वय ५५, रा. सावेडी) यांनी ऑगस्ट २०२४ मध्ये रिजॉईस इव्हेंट ऑर्गनायझेशन कंपनीच्या आरोपींशी संपर्क साधला. आरोपी राहुल दर्शन जगताप, एंजल राहुल जगताप, सुशिला दर्शन जगताप (सर्व रा. सानपाडा, नवी मुंबई) आणि इब्राहीम सॅम्युअल (रा. भोपाळ) यांनी बन्सल यांना कंपनीत गुंतवणूक केल्यास महिन्याभरात १५ टक्के कमिशनसह चांगला परतावा मिळेल, असे आश्वासन दिले. या आमिषाला बळी पडून बन्सल यांनी कंपनीच्या खात्यात तब्बल ४ कोटी ७ लाख रुपये जमा केले.

मात्र, आरोपींनी दिलेल्या आश्वासनानुसार परतावा देण्यास टाळाटाळ सुरू केली. काही कालावधीनंतर त्यांनी बन्सल यांना फक्त ३ कोटी ९ लाख रुपये परत केले, तर उर्वरित ८० लाख रुपये आणि वचन दिलेले कमिशन देण्यास नकार दिला. यामुळे बन्सल यांनी प्रथम पोलिस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केली. मात्र, पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने त्यांनी थेट जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला. या अर्जावर ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. अभिजित पुप्पाल यांनी बन्सल यांच्या वतीने प्रभावी युक्तिवाद केला.

न्यायालयाने सर्व पुरावे आणि युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहिता (कलम ३१८(४), ३१६(२), ३(५)), महाराष्ट्र प्रोटेक्शन ऑफ इंटरेस्ट ऑफ डिपॉझिटर्स अॅक्ट (कलम ३, ४, ५) आणि माहिती तंत्रज्ञान कायदा (कलम ६६(डी)) अंतर्गत गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले. या आदेशानुसार, एमआयडीसी पोलिसांनी तपास सुरू केला असून, आरोपींच्या कृतींची सखोल चौकशी केली जाणार आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा आणि आमचे फेसबुक पेज लाईक करा