एखादी व्यक्ती समोर आली की ती नेहमी हसतमुख असते, सर्वांशी सहज बोलते, दिसायलाही खूपच स्मार्ट आणि तिच्या भोवती नेहमी लोकांचा गराडा असतो… अशा लोकांच्या आयुष्यात एक विलक्षण आकर्षण असतं. त्यांच्याकडे पाहून असं वाटतं की नशीब कायम त्यांच्यासोबत आहे. ही फक्त एक भावना नाही, तर यामागे अंकशास्त्राचं एक मोठं गुपित असतं आणि ते गुपित आहे “संख्या 6”.
मूलांक 6

अंकशास्त्रानुसार, जर एखाद्या व्यक्तीचा जन्म 6, 15 किंवा 24 तारखेला झाला असेल, तर त्या व्यक्तीचा मूलांक म्हणजेच मूलभूत अंक 6 असतो. या अंकावर शासन असतो शुक्र ग्रहाचा, ज्याला सौंदर्य, प्रेम, कला आणि विलासिता यांचा अधिपती मानलं जातं. त्यामुळेच या संख्येचे लोक जिथे असतात, तिथे सौंदर्य, सुसंवाद आणि चमकदार व्यक्तिमत्त्व आपोआपच जाणवतं.

संख्या 6 असलेल्या व्यक्ती जन्मतःच भाग्यवान असतात. त्यांच्या आयुष्यात पैसा, प्रतिष्ठा आणि प्रसन्नता यांचा अभाव फार कमी वेळा दिसतो. अनेक वेळा ते लहान वयातच स्वतःचं वेगळं स्थान मिळवतात मग ते व्यवसायात असो की कलाक्षेत्रात. विशेष म्हणजे हे लोक इतरांसाठीही नेहमी काहीतरी चांगलं करण्यासाठी उत्सुक असतात. त्यांच्याकडे एक नैसर्गिक आकर्षण असतं, जे इतरांना सहजपणे त्यांच्याकडे खेचतं.
‘या’ क्षेत्रात मिळतं यश

शुक्राच्या प्रभावामुळे त्यांची सौंदर्यदृष्टीही अतिशय तीव्र असते. हे लोक फॅशन, जीवनशैली, डिझाइन, इंटीरियर, संगीत, नृत्य, रंगभूमी, अभिनय आणि गायन यासारख्या सर्जनशील क्षेत्रात खूप नैसर्गिकरित्या रमतात. ते केवळ स्वतःसाठीच नव्हे तर इतरांसाठीही सौंदर्य आणि सौजन्य निर्माण करण्यात आनंद मानतात.

या लोकांसाठी शुभ रंगांमध्ये पांढरा आणि निळा रंग विशेष महत्त्वाचा असतो. हे रंग त्यांच्या मनःशांतीला आणि भाग्याला अधिक प्रबल करतात. सोमवार, मंगळवार, बुधवार आणि शुक्रवार हे त्यांच्या जीवनातील शुभदिवस मानले जातात याच दिवशी एखादं महत्त्वाचं काम केल्यास अधिक यश मिळतं असं मानलं जातं.

संख्या 6 असलेली माणसं श्रीमंती आणि सुखसंपन्नतेचं स्वप्न पाहत नाहीत ते स्वप्न ते खऱ्या अर्थाने जगतात. त्यांच्या जीवनशैलीत कार, बंगला, प्रवास, उत्तम कपडे आणि समृद्धी यांचा समावेश असतो, पण हे सगळं ते अतिशय सोज्वळ आणि मनमिळावूपणे स्वीकारतात.








