नगरकरांनी यावर्षीचा गणेश उत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करावा, आयुक्त यशवंत डांगे यांचे आवाहन

Author Picture
By Vaishnavi Swami Published On: August 26, 2025

अहिल्यानगर- महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी यावर्षीचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन केले आहे. शाडू मातीच्या मूर्तींचा वापर करून प्रदूषण टाळणे, तसेच प्लॅस्टिक आणि थर्माकोलसारख्या घातक पदार्थांचा वापर टाळणे यावर त्यांनी विशेष भर दिला.

महानगरपालिका आणि भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने ‘माझी वसुंधरा अभियान ६.०’ अंतर्गत शाडू मातीपासून गणेशमूर्ती तयार करण्याची कार्यशाळा घेण्यात आली. फिरोदिया हायस्कूलमध्ये झालेल्या या उपक्रमात सुमारे ११० विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी शाडू मातीच्या मूर्ती घडवून पर्यावरणपूरक सण साजरा करण्याचा संदेश दिला.

याच उपक्रमाचा विस्तार महानगरपालिका शाळा क्र. ४, रेल्वे स्टेशन येथेही करण्यात आला. येथे कला शिक्षक व स्वच्छता दूत डॉ. अमोल बागूल यांच्या मार्गदर्शनाखाली जवळपास १०० विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. मुलांनी स्वतःहून गणेशमूर्ती घडवून सणाच्या तयारीला पर्यावरणपूरक दिशा दिली.

या कार्यशाळांमध्ये प्राचार्य उल्हास दुगड, उपप्राचार्य कैलास साबळे, पर्यवेक्षक बाळासाहेब वाव्हळ, वैभव कुलकर्णी, कल्पना पाठक, शिल्पकार बालाजी वल्लाळ, पर्यावरणदूत सतीश गुगळे, अध्यापक बाळासाहेब पालवे, अर्चना आळकुटे, मनिषा कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

महानगरपालिका ‘माझी वसुंधरा अभियान’ अंतर्गत विविध उपक्रम राबवत असून, त्याचा मुख्य उद्देश पर्यावरणाचे रक्षण करणे हा आहे. गणेशोत्सवात शाडू मातीच्या मूर्तींचा वापर, नैसर्गिक सजावटीचे साहित्य, तसेच बंदी घालण्यात आलेल्या प्लॅस्टिक-थर्माकोलपासून दूर राहणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. पर्यावरणपूरक सण साजरा करून पुढील पिढ्यांसाठी स्वच्छ व निरोगी वातावरण राखण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

अहिल्यानगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा आणि आमचे फेसबुक पेज लाईक करा