शिर्डीत विखेंच्या विरोधात काँग्रेसची चाल, प्रभावती घोगरे यांच्याकडे मोठी जबाबदारी

Author Picture
By Vaishnavi Swami Published On: July 31, 2025

अहिल्यानगर जिल्हा हा काँग्रेसच्या विचारांचा बालेकिल्ला राहिला असून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने जाहीर झालेल्या नवीन समितीमध्ये जिल्ह्यातील महिला नेत्या प्रभावती घोगरे यांची राज्य जनरल सेक्रेटरी निवड झाली. या निवडीबद्दल काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला.

यशोधन जनसंपर्क कार्यालय येथे घोगरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, डॉ. सुधीर तांबे, तालुकाध्यक्ष अजय फटांगरे, महिला काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्ष पद्मा थोरात, शितल उगलमुगले, मीना थेटे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

प्रभावती घोगरे यांनी कृषी क्षेत्रात आदर्शवत काम केले असून महिलांचे मोठे संघटन केले आहे. मोठा जनसंपर्क सहज संवाद, कृषीप्रधान संस्कृती आणि जनसेवेचा समर्थ वारसा यामुळे त्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये महिलांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची निवड झाली आहे.

यावेळी माजी मंत्री थोरात म्हणाले की काँग्रेस पक्षाला मोठी परंपरा असून काँग्रेस पक्षाने महिलांसाठी 50 टक्के आरक्षण आणले. महिला सबलीकरणासाठी अनेक योजना राबवताना अन्नसुरक्षा कायदा, आरोग्य सुरक्षा, माहितीचा अधिकार, याचबरोबर देशाने साधलेली प्रगती ही काँग्रेस पक्षाच्या काळातील आहे. काँग्रेसचे योगदान कोणीही नाकारू शकणार नाही.

प्रभावती घोगरे म्हणाल्या की, आपण कायम सर्वसामान्य शेतकरी गोरगरीब यांच्या हिताचा विचार केला आहे. पक्षाने आपल्यावर मोठा विश्वास टाकला. माझ्या निवडणुकीच्या प्रचारासाठी राष्ट्रीय नेत्या प्रियांका गांधी या उपस्थित होत्या. मात्र राहता विधानसभेमध्ये निवडणूक प्रक्रियेची झालेला गोंधळ सर्व देशाला माहीत झाला आहे. यापुढील काळात महिला सबलीकरणासाठी अधिक सक्रियतेने काम करू असे त्या म्हणाल्या
.
घोगरे यांच्या निवडीबद्दल प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, जिल्हाध्यक्ष जयंतराव वाघ, शहराध्यक्ष दिप चव्हाण, माजी नगराध्यक्ष दुर्गा तांबे, डॉ. जयश्री थोरात यांच्यासह विविध मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा आणि आमचे फेसबुक पेज लाईक करा