नगर तालुक्यातील आगडगाव येथील श्री काळभैरवनाथ देवस्थानात दर्शनासाठी आलेल्या भाविकाच्या कारची काच फोडून पर्समधील रोकड चोरल्याची घटना रविवारी (७ सप्टेंबर) दुपारी घडली. चोरीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाल्याने पोलिसांनी आणि सुरक्षा रक्षकांनी चोरट्याला तात्काळ पकडले.
कारमधील पर्सवर डोळा
फिर्यादी सविता सुभाष वाघ (वय ४९, रा. नालेगाव, अ.नगर, सध्या रा. कमलनगर, ता. वडगाव, जि. जळगाव) या शिक्षिका असून त्या सुट्टीसाठी मूळगावी आल्या होत्या. कुटुंबासह दर्शनासाठी त्या वॅगन आर कारने आगडगावच्या श्री काळभैरवनाथ देवस्थानात गेल्या होत्या. दुपारी १२.३० वाजता दर्शन करून परत आल्यावर त्यांना कारची काच फुटलेली दिसली. तपासल्यावर पर्समधील ७ हजार रुपये चोरीस गेले असल्याचे लक्षात आले.
सीसीटीव्हीत कैद झालेला चोरटा
चोरीची माहिती त्यांनी देवस्थानच्या सुरक्षा रक्षकांना दिली. रविवारी मंदिरात मोठी गर्दी असल्याने तेथे पोलिस बंदोबस्तासाठी उपस्थित होते. पोलिसांनी आणि कर्मचाऱ्यांनी लगेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, कार शेजारी उभ्या असलेल्या दुसऱ्या वाहनातून आलेल्या व्यक्तीने ही चोरी केल्याचे स्पष्ट झाले.
आरोपी अटकेत, रोकड हस्तगत
पोलिसांनी तत्काळ आरोपीचा शोध घेतला आणि त्याला ताब्यात घेतले. त्याचे नाव आसीम युनुस शेख (वय ३४, रा. कृष्णनगर, घोडेगाव, ता. नेवासा) असे असून तो कार चालक आहे. तो मारुती स्विफ्ट कार भाड्याने घेऊन मंदिरात आला होता. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून चोरलेली रोकड जप्त केली.
गुन्हा दाखल, तपास सुरू
या प्रकरणी फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध बीएनएस कलम ३०३ (२), ३२४ (४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल शैलेश सरोदे करत आहेत.








