अहिल्यानगरमध्ये यंदाचा गणेशोत्सव अधिक भव्य आणि उत्साहवर्धक करण्यासाठी प्रशासनाकडून व्यापक तयारी सुरू आहे. महाराष्ट्र शासनाने यंदाचा गणेशोत्सव ‘राज्योत्सव’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतल्याने या उत्सवाचे महत्त्व अधिक वाढले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी सर्व गणेश मंडळांना शांतता, सुरक्षितता आणि सामाजिक एकतेचा संदेश देत उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले.
जिल्हास्तरीय आढावा बैठक
गणेशोत्सवाच्या नियोजनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, निवासी उपजिल्हाधिकारी यादासाहेब गिते, उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, महानगरपालिकेचे उपायुक्त विजयकुमार मुंडे, पोलीस उपअधीक्षक वैभव कलबुर्गी यांच्यासह विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.
सामाजिक भान असलेले देखावे
डॉ. आशिया यांनी गणेश मंडळांना सजावट आणि देखावे तयार करताना शासनाच्या लोकोपयोगी योजनांचा संदेश पोहोचवण्याचे आवाहन केले. कॅन्सर, हृदयरोग, अपघातग्रस्त रुग्ण, गुडघा व मणक्यांच्या शस्त्रक्रियांसारख्या गंभीर आजारांवरील उपचारांसाठी सुरू असलेल्या आरोग्ययोजना, ‘ऑपरेशन सिंदूर’, तसेच ‘आत्मनिर्भर भारत’ अभियान याविषयी जनजागृती करण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. या संदर्भात शासनामार्फत स्पर्धा आयोजित करण्यात आली असून सर्व मंडळांनी त्यात सहभागी व्हावे असेही त्यांनी स्पष्ट केले.
स्वच्छता आणि मूलभूत सोयीसुविधा
महानगरपालिकेचे उपायुक्त विजयकुमार मुंडे यांनी सांगितले की शहरात सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांमुळे येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी तातडीने दुरुस्ती सुरू आहे. स्वच्छतेसाठी ३० घंटागाड्या व १० ट्रॅक्टरद्वारे कचरा संकलन केले जात असून, उत्सवकाळात अतिरिक्त मनुष्यबळ व वाहने उपलब्ध करून दिली जाणार आहेत. रस्त्यांवरील मोकाट जनावरे आणि भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाणार आहे. तसेच विसर्जनासाठी पारंपरिक ठिकाणांसह १७ कृत्रिम विसर्जन कुंडांची निर्मिती केली जाणार आहे. मंडळांना परवानगी प्रक्रियेसाठी ‘एक खिडकी योजना’ लागू करण्यात आली आहे.
कायदा व सुव्यवस्थेची खबरदारी
पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी सांगितले की, उत्सवात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून काटेकोर सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. ४०० समाजकंटकांची यादी तयार करून त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे. चोरीसारख्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी साध्या वेशातील पोलीस नेमले जाणार असून, सर्व गणेश मंडळांनी स्वतःच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत अशी सूचना देण्यात आली. गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद हे दोन्ही सण शांततेत पार पडावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
वाहतूक आणि ध्वनीप्रदूषण नियंत्रण
मिरवणुकीच्या मार्गावरील खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती, विसर्जन स्थळी योग्य प्रकाशव्यवस्था, पार्किंगची सोय आणि लाईफगार्ड्सची नियुक्ती यावर जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष भर दिला. ध्वनीप्रदूषण टाळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ठरवलेल्या वेळेत आणि मर्यादित डेसिबलमध्येच ध्वनीयंत्रणा वापरण्याचे बंधन घालण्यात आले आहे. वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून विशेष नियोजन केले जाणार असून पथदिवे नियमित सुरू राहतील याचीही दक्षता घेण्यात येईल.








