प्रसिद्ध अभिनेत्री राणी मुखर्जीने घेतले साईबाबांचे दर्शन, नवऱ्यांच्या आगामी चित्रपटाच्या यशासाठी साईबाबाचरणी केली प्राथर्ना

Author Picture
By Vaishnavi Swami Published On: August 13, 2025

शिर्डी- बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी नुकतीच ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्काराची मानकरी ठरली आहे. आपल्या अभिनय कारकिर्दीतील हा पहिलाच राष्ट्रीय सन्मान मिळाल्यानंतर राणी मुखर्जीनं थेट शिर्डी गाठून श्री साईबाबांच्या समाधीसमोर नतमस्तक होऊन कृतज्ञता व्यक्त केली.

मंगळवारी दुपारी राणी मुखर्जी हिने साई समाधीचे दर्शन घेतले. यावेळी तिचा भाऊ आयान मुखर्जी सोबत होता. याप्रसंगी श्री साईबाबा संस्थानच्या वतीने पर्यवेक्षक राजेंद्र पवार यांच्या हस्ते राणी मुखर्जी यांचा सत्कार करण्यात आला. जनसंपर्क अधिकारी दीपक लोखंडे देखील उपस्थित होते. राणी मुखर्जीला पाहण्यासाठी चाहत्यांसह भाविकांनी मंदिर परिसरात मोठी गर्दी केली होती.

साई दर्शनानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना राणी म्हणाली की, साईबाबांच्या जवळ आल्यानंतर नेहमीच चांगले वाटते. बाबांचे बोलावणे कधी येईल, याची मी नेहमी वाट पाहते. बोलावणे आले की मी धाव घेते. नुकताच मला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला असून त्यासाठी बाबांचे आभार मानायला आले आहे. तिने पुढे सांगितले की, माझ्या पतीचा ‘वॉर २’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. त्याच्या यशासाठी साईबाबांच्या चरणी प्रार्थना केली आहे.

मुंबईतही मी साईबाबांचे दर्शन घेते, मात्र शिर्डीत येण्याचा अनुभव काही वेगळाच असतो. सर्वांनी आयुष्यात एकदा तरी शिर्डीला यावे आणि बाबांच्या अनुभवाचा गोडवा वर्षभर मनात ठेवावा.

अहिल्यानगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा आणि आमचे फेसबुक पेज लाईक करा