अहिल्यानगर- पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड आणि करमाळा या तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या दीर्घकालीन पाणीवाटपाच्या प्रश्नांवर लवकरच समाधानकारक तोडगा निघणार असल्याचे संकेत माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिले आहेत. बोलताना त्यांनी स्पष्ट केलं की, डिंबे-माणिकडोह बोगदा आणि साळळाई योजनेबाबत येत्या एका महिन्यात गूड न्यूज मिळेल असं त्यांनी सांगितलं आहे.
तळपृष्ठ वाद मिटल्यामुळे प्रकल्प मार्गी
डिंबे-माणिकडोह योजनेच्या अंमलबजावणीत तळपृष्ठ निश्चितीचा मुद्दा अडथळा ठरत होता. मात्र, आता तो वाद मिटल्यामुळे प्रकल्पाला गती मिळाली आहे. बोगद्याच्या मार्गात येणाऱ्या लाभधारक क्षेत्रातील शेतकऱ्यांना कोणताही अन्याय होणार नाही, याची पूर्णपणे काळजी घेतली जात असल्याची ग्वाही डॉ. विखे यांनी दिली.
नवीन आराखड्यात चार उपसा सिंचन योजनांचा समावेश
कुकडी प्रकल्पाचा नवा सुधारित आराखडा तयार करण्यात आला असून, त्यामध्ये डिंबे धरणातून प्रस्तावित असलेल्या चार उपसा सिंचन योजनांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. या योजनांमुळे संबंधित भागात सिंचन क्षमता लक्षणीय वाढण्याची शक्यता आहे. नवीन आराखडा आता राज्य मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी सादर केला जाणार आहे.
साळळाई योजना आणि अभ्यासपूर्व कामकाज पूर्ण
डिंबे आणि माणिकडोहसह साळळाई योजनेवर सुद्धा व्यापक अभ्यास करण्यात आला आहे. स्थानिक शेतकऱ्यांच्या भावनांचा आदर राखत हा प्रकल्प तयार केला गेला असून, त्यातून व्यापक जलविकास साधण्याचा सरकारचा हेतू असल्याचे डॉ. विखे यांनी स्पष्ट केले.
श्रीगोंदा एमआयडीसीच्या विकासाला चालना
श्रीगोंदा तालुक्यातील औद्योगिक विकासासाठीही महत्वाची पावले उचलण्यात आली आहेत. ५५० एकर क्षेत्रावर प्रस्तावित औद्योगिक वसाहतीचा आराखडा पूर्ण झाला असून, रस्ते विकासाचाही समावेश या योजनांमध्ये आहे. हा प्लॅन लवकरच मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर केला जाईल. त्यानंतर लोणीव्यंकनाथ–बेलवंडी परिसरातील एमआयडीसीसाठी नवे दालन खुले होईल आणि स्थानिक रोजगार संधी वाढतील.








