गणेश उत्सव आनंदाचा व श्रद्धेचा विषय, पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करा; माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे आवाहन

Author Picture
By Vaishnavi Swami Published On: August 29, 2025

संगमनेर- गणेश उत्सव आनंदाचा व श्रद्धेचा विषय आहे. हा सणांचा काळ आनंदाचे पर्व असून या काळात आरोग्याची हानी होणार नाही. याकरीता डीजे, लेझर किरण व गुलालाचा वापर टाळून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करा, असे आवाहन काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

माजी आ. डॉ. सुधीर तांबे यांच्या प्रभा निवासस्थानी नुकतीच श्री गणेशाची आरती करण्यात आली. यावेळी कांचनताई थोरात, माजी आ. डॉ. सुधीर तांबे, दुर्गाताई तांबे, आमदार सत्यजित तांबे, डॉ. मैथिली तांबे, डॉ. वर्षा तांबे, विजय राहणे, शरद बटवाल, बाबासाहेब कडनर, नितीन अभंग, ज्ञानेश्वर राक्षे यांच्यासह संगमनेर शहरातील कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, महात्मा ज्योतिबा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी शोधून काढली. आणि त्यानंतर महाराष्ट्रात शिवजयंती उत्सव आणि गणेशोत्सव सुरू झाले. सर्वांनी एकत्र येऊन हे उत्सव आनंदाने साजरे करायचे आहे. खरे तर हे आनंदाचे पर्व आहे. गणेश उत्सव हा श्रद्धेचा आणि आनंदाचा विषय आहे. मात्र, या काळामध्ये आरोग्याची हानी होणार नाही ही काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे.

तर माजी आ. डॉ. तांबे म्हणाले की, सर्वांनी एकत्र येऊन हा उत्सव साजरा करायचा आहे. यामध्ये लहान-थोर, गरीब-श्रीमंत, असा कोणताही भेद नाही. एकत्र येण्याची ही मोठे माध्यम असून सर्वधर्म समभाव जोपासण्याची परंपरा गणेशोत्सवाच्या काळामध्ये सर्वांनी जोपासली पाहिजे. याचबरोबर आनंद साजरा करताना युवकांनी अति उत्साह टाळावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. याप्रसंगी आमदार सत्यजित तांबे व डॉ. मैथिली तांबे यांनी स्वागत केले. यावेळी शहरातील कार्यकर्ते, युवक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

अहिल्यानगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा आणि आमचे फेसबुक पेज लाईक करा