जेनेलिया देशमुखचं हसणं जितकं मोहक, तितकंच तिचं तेजस्वी आणि तरुण दिसणारं रूपही अनेकांचं लक्ष वेधून घेतं. दोन मुलांची आई असूनही तिच्या चेहऱ्यावर अजिबात थकवा नाही, उलट आजही तिची त्वचा 25 वर्षांच्या मुलीसारखी ताजीतवानी आणि उजळ दिसते. अनेकांना आश्चर्य वाटतं की एवढं सर्व सांभाळून ती स्वतःची त्वचाही इतकी सुंदर कशी ठेवू शकते? पण यामागे कोणताही जादूचा फॉर्म्युला नाही, तर तिच्या दररोजच्या लहान पण शिस्तबद्ध सवयी आहेत.
जेनेलियाचे ब्युटी सिक्रेट

जेनेलिया तिच्या त्वचेच्या आरोग्याला खूप महत्त्व देते. ती सतत सोशल मीडियावर आपल्या कुटुंबासोबतच्या खट्याळ व्हिडिओंद्वारे चाहत्यांच्या संपर्कात असते, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे, ती स्वतःच्या शरीर आणि त्वचेसोबतही तितकीच सजग आहे. तिचं पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं गुपित म्हणजे ‘पाणी’. दिवसभर भरपूर पाणी पिणं ही तिची सवय आहे. ती म्हणते की, हायड्रेशन हे फक्त त्वचेसाठीच नव्हे, तर शरीराच्या प्रत्येक पेशीच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. पाण्यामुळे त्वचा आतून स्वच्छ राहते आणि चेहऱ्यावर नैसर्गिक झळाळी दिसते.

तिच्या सौंदर्य दिनक्रमात मॉइश्चरायझिंगला खास स्थान आहे. त्वचा स्वच्छ केल्यानंतर ती कोणत्याही स्थितीत मॉइश्चरायझर वापरणं विसरत नाही. तिच्या मते, मॉइश्चरायझर त्वचेचा ओलावा टिकवून ठेवतो आणि अतिरिक्त तेलामुळे मुरुमांची शक्यता कमी होते. ती सौंदर्य उत्पादने खूप विचारपूर्वक निवडते आणि आपल्या त्वचेला काय साजेसं आहे हे जाणून घेऊन तेच वापरते.

कोरफड जेल

जेनेलियाचा आणखी एक आवडता घटक म्हणजे कोरफड जेल. कोरफडमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन के हे त्वचेवरचा थकवा, डाग, मुरुमांचे व्रण यावर प्रभावीपणे काम करतात. कोरफड जेल हलकं असल्यामुळे ते त्वचेच्या खोल थरांपर्यंत पोहोचून त्वचेला आतून पोषण देतं. त्यामुळे ती रोजच्या दिनचर्येत हे वापरणं विसरत नाही.

दिवसभर कितीही थकवा झाला असो किंवा कामाचा ताण असो, जेनेलिया झोपण्यापूर्वी तिचा चेहरा नीट धुतल्याशिवाय कधीच झोपत नाही. मेकअप केलेला असो किंवा नाही, त्वचेवरची सगळी घाण दूर करूनच ती झोपते. तिच्या मते, दिवसभर त्वचेवर साचलेली धूळ, प्रदूषण, आणि इतर कण त्वचेला त्रासदायक ठरू शकतात, त्यामुळे रात्री ती पूर्ण स्वच्छ करूनच विश्रांती घेते.








