वाहनचालकांसाठी आनंदाची बातमी! ट्राफिक पोलिसांनी चुकून कापलेले चलनही रद्द करता येणार, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Author Picture
By Vaishnavi Swami Published On: July 5, 2025

कधी कधी आपण काहीही चूक न करताही आपल्या वाहनावर ई-चलन येते आणि मग आपल्याला वाटते, “हे कधी आणि कुठे झाले?” अशा वेळी अनेकांना वाटते की आता दंड भरावा लागणारच, काही पर्याय नाही. पण खरंतर, तुमच्या हातातच एक असा पर्याय आहे की ज्यामुळे तुम्ही चुकून किंवा चुकीने आलेले ई-चलन घरबसल्या रद्द करू शकता, तेही अगदी मोफत.

आजकाल वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन झाले की कॅमेऱ्यांद्वारे चलन थेट तुमच्या मोबाईलवर येते. पण अनेक वेळा चुकीच्या वाहन क्रमांकावर किंवा चुकीच्या ओळखीवर चलन जारी होतं. उदाहरणार्थ, एखाद्या वाहनाचा नंबर तुमच्या गाडीच्या नंबराशी मिळता जुळता असेल, किंवा त्या क्षणी तुम्ही त्या ठिकाणी नव्हता, तरीही तुमच्या नावावर दंड लागतो. अशावेळी आपण न घाबरता कायदेशीर मार्गाने हे चलन रद्द करू शकतो.

‘असं’ रद्द करा चुकीचे चलन

सर्वप्रथम, भारत सरकारच्या परिवहन विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर म्हणजे echallan.parivahan.gov.in या पत्त्यावर जा. ही वेबसाईट ई-चलनसाठी खास तयार करण्यात आली आहे, आणि येथे तुम्हाला ‘Dispute’ किंवा ‘तक्रार’ या विभागात प्रवेश करावा लागेल.

तिथे गेल्यावर तुम्हाला तुमचा ई-चलन क्रमांक, वाहन क्रमांक आणि मोबाईल क्रमांक भरावा लागतो. ही माहिती दिल्यानंतर तुम्ही त्या चलनाशी संबंधित पुरावे अपलोड करू शकता. उदा., जर कॅमेऱ्यात चुकून दुसऱ्या वाहनाचा फोटो आला असेल, किंवा त्या वेळी तुम्ही दुसऱ्याच ठिकाणी होतात याचा जीपीएस किंवा पार्किंग रिसीटचा पुरावा असेल, तर ते दाखवता येते. वाहनाचा फोटो, आरसी कॉपी, किंवा GPS लोकेशनसारखे कागदपत्रे हे दावा योग्य सिद्ध करण्यासाठी उपयुक्त ठरतात.

अर्जाची स्थितीही तपासता येणार

एकदा का तक्रार दाखल केली की तुम्हाला एक तक्रार आयडी दिला जातो. या आयडीच्या मदतीने तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती नंतरही तपासू शकता. जर तक्रार वैध आढळली, तर चलन रद्द केलं जातं आणि जर तुमच्याकडून आधीच दंड भरला असेल, तर ती रक्कम परत देखील मिळू शकते.

मात्र, यामध्ये खोटा दावा करू नका. कारण जर पुरावे अपुरे असतील किंवा खोटे सादर केले गेले, तर तक्रार सरळ फेटाळली जाते. त्यामुळे योग्य माहिती, स्पष्ट पुरावे आणि संयम याचा वापर केल्यास, तुम्ही घरबसल्या चुकीचा चलन टाळू शकता.

अहिल्यानगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा आणि आमचे फेसबुक पेज लाईक करा