नगरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. ग्रामपंचायत अधिकाऱ्याला जेवणासाठी गेलेल्या हॉटेलबाहेर अडवून बंदूक दाखवत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरणी पाथर्डी तालुक्यातील एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरात या घटनेची चर्चा रंगली आहे.
कोतवाली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी दिलीप संजय मिसाळ (वय ३९, नेमणूक – पिंगेवाडी ग्रामपंचायत, ता. शेवगाव, मूळ रा. कन्हेटाकळी, ता. शेवगाव) हे ५ सप्टेंबर रोजी दुपारी नगर-पुणे रोडवरील केडगाव येथील संदीप हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. यावेळी हॉटेलच्या प्रवेशद्वारावर अमोल चंद्रकांत गवळी (रा. जवखेडे खालसा, ता. पाथर्डी) याने त्यांना अडवले.
गवळीने ग्रामसेवक मिसाळ यांना लक्ष्य करत, “तू आमच्याकडे असताना विरोधकांचे ऐकून काम केलेस. आता आमचे नेते खासदार झाले आहेत. आता तुझ्याकडे आणि विरोधकांकडे लक्ष देतो,” अशा शब्दांत धमकी दिली. याचवेळी त्याने हातातील बंदूक दाखवत गोळ्या घालण्याची धमकी दिली व अश्लील भाषेत शिवीगाळही केली.
या घटनेनंतर ग्रामसेवक मिसाळ यांनी ७ सप्टेंबर रोजी कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून अमोल गवळी याच्याविरुद्ध आर्म्स अॅक्ट ३/२५ आणि बीएनएस कलम ३५१ (२) (३), ३५२ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक कुणाल सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
ग्रामपंचायत अधिकाऱ्याला थेट बंदूक दाखवत धमकावण्याचा प्रकार घडल्याने स्थानिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. प्रशासनाशी संबंधित अधिकाऱ्यांनाही या घटनेमुळे असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. पोलिस तपासातून या प्रकरणातील पुढील सत्य समोर येणार आहे.








