पराभूत झालेल्या लोकांना काही आरक्षण देता येईल का, असा विचार करतोय ! विखेंचा थोरातांवर प्रहार

Author Picture
By Vaishnavi Swami Published On: September 7, 2025

Ahilyanagar Politics : काही नेते अजूनही राजकीय धक्क्यातून सावरलेले नाहीत, अशी टीका करत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. “या पराभूत झालेल्या लोकांना काही आरक्षण देता येईल का, असा विचार करतोय,” असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला.

“स्वतःला भावी मुख्यमंत्री म्हणवणारे…”
स्वतःला भावी मुख्यमंत्री म्हणून मिरवत होते असा टोला देखील विखे पाटलांनी थोरातांना लगावला , देवेंद्र फडणवीसांनी दिलेले आरक्षण न्यायालयात घालवून बसले. हे तुमचं पाप आहे, असा आरोपही विखेंनी केला “आरक्षणाबाबत तुम्हाला कधीही गांभीर्य नव्हतं. तुमचे जाणते राजे नेहमी सांगायचे की मराठा आरक्षण मिळू शकत नाही,” असे विखेंनी नमूद केले.

ओबीसी नेते हाकेंवरही टीका
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या यात्रेवर प्रतिक्रिया देताना विखे म्हणाले, “सरकारने स्पष्ट आश्वासन दिलं आहे की ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही. मग हाकेंनी विनाकारण मराठा समाजावर टीका का करावी? समाजासाठी पुढारपण करायला कुणी बंदी नाही, पण दुसऱ्या समाजावर बोट दाखवण्याचा अधिकार नाही.”

“मराठा समाजाने कधीच विरोध केला नाही”
ओबीसी आरक्षण मिळालं तेव्हा मराठा समाजाने विरोध केल्याचं एकही उदाहरण नाही, असंही विखे म्हणाले. “नवीन पुढारी प्रसिद्धी मिळवण्यासाठी फुकटची वक्तव्यं करत आहेत. अपघाताने पुढारी झालेले लोक चर्चेत राहण्यासाठी थिल्लरपणा करत आहेत. हे राजकारणाच्या दृष्टीने खेदजनक आहे,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

“जरांगे पाटलांच्या आंदोलनाची गरज नाही”
मराठा आरक्षणाबाबत बोलताना विखे म्हणाले, “गाव पातळीवर समित्या नेमल्या आहेत. मिळालेल्या माहितीच्या आधारे दाखले देण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा आंदोलन करण्याची आवश्यकता नाही.”

अहिल्यानगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा आणि आमचे फेसबुक पेज लाईक करा