घरात पैसा येतो, पण टिकत नाही. उत्पन्न उत्तम असूनही खर्च वाढतात, अडचणी कमीच होत नाहीत… तुम्हालाही कधी असं वाटतं का? मग कारण केवळ परिस्थिती नसून, कदाचित तुमच्या घरात वास्तुशास्त्राच्या काही नियमांकडे दुर्लक्ष झालंय.धनाची देवता लक्ष्मी प्रसन्न होण्यासाठी फक्त मेहनत नाही, तर घरातील योग्य उर्जा आणि दिशा यांचंही तितकंच महत्त्व असतं.

वास्तुशास्त्रात असे अनेक उपाय सांगितले गेलेत, जे अगदी सहजपणे करता येतात, आणि त्याचा परिणाम तुमच्या आर्थिक स्थितीवर आश्चर्यकारक होऊ शकतो. कोणताही खर्च न करता, केवळ थोडंसं लक्ष केंद्रित केल्यास नकारात्मकतेला दूर ठेवून घरात समृद्धी आणता येते.
तिजोरीची दिशा

सर्वप्रथम लक्षात ठेवा, उत्तर दिशा ही कुबेराची दिशा आहे. म्हणूनच घरात पैसे साठवण्यासाठी जसं की तिजोरी, पैशांचं कपाट किंवा आर्थिक कागदपत्रं यांची व्यवस्था नेहमी उत्तर दिशेकडे करून ठेवावी. तिजोरीचं द्वार दक्षिणेकडे नसून उत्तरेकडे उघडणं ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. असं केल्यास धनप्रवाह स्थिर राहतो आणि पैसा टिकतो.
मुख्य दरवाजा

घराच्या मुख्य दरवाजावर रोज संध्याकाळी तुपाचा दिवा लावा. यामागे श्रद्धा असली तरी यामध्ये सकारात्मकतेचा मोठा संदेश आहे. देवी लक्ष्मी संध्याकाळी घरात प्रवेश करते, असं मानलं जातं. तिचं स्वागत उजळ दिव्याने केल्यास घरात शांती आणि स्थैर्य नांदतं. यासोबतच दरवाजावर शुभ प्रतीक स्वस्तिक काढणं देखील फार शुभ मानलं जातं. स्वस्तिक ही केवळ धार्मिक चिन्ह नसून, सकारात्मकतेचं आणि स्थिरतेचं प्रतीक आहे.
ईशान्य दिशा

वास्तुशास्त्रात ईशान्य दिशा (उत्तर-पूर्व कोपरा) सर्वात पवित्र मानली गेलीय. इथे देव-देवतांचा वास असतो, असं मानलं जातं. त्यामुळे घरात या कोपऱ्यात जर तुम्ही एक छोटं मत्स्यालय (fish aquarium) किंवा कारंजं ठेवू शकत असाल, तर त्याने घरात शांततेसह आर्थिक वृद्धीही होते, असं म्हटलं जातं.
स्वच्छता

स्वच्छता हे लक्ष्मीमातेला आकर्षित करण्याचं सर्वात मोठं साधन आहे. घरात कुठेही तुटलेल्या, धुळीच्या वस्तू न ठेवणं, विशेषतः जिथे पैसे ठेवले जातात तिथं हे अत्यावश्यक आहे. लक्ष्मीमातेचं वास्तव्य फक्त स्वच्छतेतच होतं, असं प्रत्येक पुराण सांगतं.








