संगमनेर- अज्ञात चोरट्याने बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून लोखंडी कपाटात ठेवलेले ६५ हजार रुपये रोख रकमेसह सोन्याचे दागिने, असा एकूण ९ लाख ५२ हजार २८० रुपयांचा ऐवज चोरला. तालुक्यातील कौठे कमळेश्वर येथे मंगळवारी सकाळी साडेदहा ते दीड वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सोमनाथ शिवाजी भडांगे (रा. कवठे कमळेश्वर) हे मंगळवारी (दि. १२) ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास गावात कार्यक्रम असल्याने कुटुंबासह सदर कार्यक्रमास गेले होते. कार्यक्रम संपल्यानंतर त्यांची पत्नी, मुले व भावजयी दुपारी दीड वाजेच्या सुमारास परत घरी गेले. घराचे कुलूप तुटले असल्याचे त्यांच्या पत्नीच्या निदर्शनास आले.
याबाबत सदर महिलेने आपल्या पत्नीला कळविले. भडांगे हे त्वरित आपल्या घरी गेले. घरात जाऊन पाहणी केली असता, बेडरूम मध्येच असलेले लोखंडी कपाटाचे लॉक उचकटुन सामान अस्थाव्यस्त टाकल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी कपाटात ठेवलेल्या सामानाची तपासणी केली असता, कपाटामध्ये ठेवलेले दागिने व रोख रक्कम चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
याबाबत सोमनाथ शिवाजी भडांगे (रा. कौठे कमळेश्वर, ता. संगमनेर) यांनी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. भर दिवसा चोरी झाल्याने कवठे कमळेश्वर येथे भीतीचे वातावरण पसरले आहे.
अज्ञात चोरट्याने कपाटामधून साडेचार ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र, १ लाख ४६ हजार २५ रुपये किमतीचे २० ग्रॅम वजनाचे मिनी गंठण, ७८ हजार ७१३ रुपये किमतीचे नेकलेस, ५३ हजार ६४ रुपये किमतीचे कानातील झुबे, १९ लाख ३ हजार ५८१ रुपये किमतीचे २४ ग्रॅम वजनाचे मोठे गंठण, ९५ हजार रुपये किमतीचे पेंडल, ८७ हजार ४३८ रुपये किमतीचे बेसलेट ४४ हजार १२८ किमतीच्या दोन अंगठ्या, १ लाख ५५ हजार रुपये किमतीची चैन व ६५ हजार रुपये किमतीचे रोकड, असा एकूण ९ लाख ९२ हजार २८० रुपयांचा ऐवज चोरी केला आहे.








