पश्चिम आशियातील वाढत्या तणावाचा फटका केवळ तेलबाजारापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर त्याची झळ आता भारताच्या बासमती तांदूळ निर्यातीपर्यंत पोहोचली आहे. इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धामुळे समुद्री वाहतूक विस्कळीत झाली असून त्याचा थेट परिणाम भारतीय निर्यातदारांवर झाला आहे. विशेषतः आखाती देशांकडे जाणाऱ्या बासमती तांदळाच्या लाखो टन खेपा सध्या समुद्रात किंवा बंदरांवर अडकून पडल्या आहेत. या परिस्थितीमुळे निर्यातदार, व्यापारी आणि शेतकरी यांच्यासमोर मोठे आर्थिक आव्हान उभे ठाकले आहे.
होर्मुझ सामुद्रधुनी बंद, जागतिक व्यापारावर परिणाम
होर्मुझची सामुद्रधुनी ही जागतिक तेल आणि मालवाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाची समुद्री वाट आहे. या सामुद्रधुनीत निर्माण झालेल्या अडथळ्यांमुळे आखाती देशांमधील जहाजांची ये-जा विस्कळीत झाली आहे. परिणामी कच्चे तेल, नैसर्गिक वायू यांसह अन्नधान्याच्या पुरवठ्यावरही परिणाम झाला आहे. भारतातून आखाती देशांकडे जाणाऱ्या तांदळाच्या जहाजांनाही या संकटाचा फटका बसला आहे.
समुद्रात अडकलेले सुमारे सहा लाख टन बासमती
ऑल इंडिया राईस एक्सपोर्टर्स असोसिएशन चे माजी अध्यक्ष विजय सेतिया यांच्या माहितीनुसार, भारतातून आखाती देशांकडे तांदूळ पोहोचण्यासाठी साधारणतः ४० दिवसांचा कालावधी लागतो. यात भारतीय बंदरांवरील प्रक्रिया, समुद्री प्रवास आणि गंतव्य देशांतील उतार प्रक्रिया यांचा समावेश असतो. सध्या अंदाजे ६ लाख टन बासमती तांदूळ विविध टप्प्यांवर अडकला आहे. काही खेपा भारतीय बंदरांवर थांबल्या आहेत, काही समुद्रात आहेत, तर काही गंतव्य देशांच्या बंदरांवर पोहोचूनही उताराची प्रतीक्षा करत आहेत.
हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक अडकली
अडकलेल्या बासमती तांदळाची एकूण किंमत सुमारे ५,००० ते ६,००० कोटी रुपयांच्या घरात असल्याचे सांगितले जाते. इतक्या मोठ्या प्रमाणात माल अडकल्यामुळे निर्यातदारांनी नवीन ऑर्डरची पॅकिंग आणि बॅगिंग प्रक्रिया तात्पुरती थांबवली आहे. परिस्थिती स्थिर झाल्यानंतरच पुढील खेपा पाठवण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. या थांबलेल्या व्यवहारांमुळे रोख प्रवाहावर ताण निर्माण झाला असून, बँकिंग आणि कर्जव्यवस्थेवरही त्याचे परिणाम दिसू शकतात.
आखाती देशांवर मोठा निर्यात अवलंबित्व
भारत दरवर्षी सुमारे ६ दशलक्ष टन बासमती तांदूळ निर्यात करतो. यापैकी सुमारे ७० टक्के निर्यात आखाती देशांकडे होते. म्हणजेच अंदाजे ४.५ दशलक्ष टन बासमती तांदूळ दरवर्षी या प्रदेशात विकला जातो. त्यातील ६ ते ७ लाख टन तांदूळ इराणला पाठवला जातो. काही वर्षांत इराणकडे बासमतीची निर्यात १.४ दशलक्ष टनांपर्यंत पोहोचल्याची नोंद आहे. त्यामुळे युद्धामुळे निर्माण झालेल्या अडथळ्यांचा भारतीय निर्यातीवर किती मोठा परिणाम होऊ शकतो, याची कल्पना येते.
गतवर्षीची निर्यात आणि उत्पादन आकडेवारी
२०२४-२५ या आर्थिक वर्षात भारतातून ६.०६५ दशलक्ष टन बासमती तांदळाची निर्यात झाली. या निर्यातीचे एकूण मूल्य सुमारे ५०,३१२ कोटी रुपये (सुमारे ५.९४ अब्ज डॉलर) इतके होते. त्याच काळात देशातील एकूण तांदूळ उत्पादन सुमारे १५० दशलक्ष टनांपर्यंत गेले, तर बासमती उत्पादन ७० ते ७५ लाख टनांच्या दरम्यान होते. चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते डिसेंबर या कालावधीतच ३२ लाख टनांहून अधिक बासमती तांदूळ आखाती देशांकडे निर्यात करण्यात आला आहे.
भारतातील दरांवर काय परिणाम होऊ शकतो?
तज्ञांच्या मते, जर संघर्ष दीर्घकाळ चालू राहिला तर भारतातील बासमती तांदळाच्या दरांवर दबाव येऊ शकतो. निर्यात ठप्प राहिल्यास देशांतर्गत बाजारात पुरवठा वाढेल आणि त्यामुळे दर कमी होण्याची शक्यता आहे. सध्या निर्यातदार ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत आहेत. परिस्थिती सुधारली आणि समुद्री मार्ग सुरळीत झाले तरच पुन्हा मोठ्या प्रमाणावर निर्यात सुरू होईल.








