अहिल्यानगर जिल्ह्यात लम्पी रोगाचा वाढतोय प्रादुर्भाव, शेतकऱ्यांना काळजी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

Author Picture
By Vaishnavi Swami Published On: August 22, 2025

अहिल्यानगर- जिल्ह्यात लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने प्रशासनाने विशेष दक्षता घेण्याचे निर्देश दिले आहेत. शुक्रवारचा पोळा सण शेतकऱ्यांसाठी आनंदाचा क्षण असला तरी यावेळी जनावरांच्या आरोग्याच्या सुरक्षेची जबाबदारी देखील तितकीच महत्त्वाची असल्याचे पशुसंवर्धन विभागाने स्पष्ट केले आहे.

बाधित जनावरे पोळ्यात न आणण्याचे निर्देश

जिल्ह्यात गेल्या महिन्यापासून लम्पी रोगाची बाधा दिसून येत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने संपूर्ण अहिल्यानगर जिल्हा ‘नियंत्रित क्षेत्र’ म्हणून घोषित केला आहे. बैलपोळ्याच्या पार्श्वभूमीवर बाधित जनावरे पोळ्यात किंवा इतर कार्यक्रमांमध्ये सहभागी करून घेऊ नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

बाजारासाठी कडक नियम

गोजातीय प्रजातीच्या जनावरांची वाहतूक, बाजारातील खरेदी-विक्री, शर्यती, जत्रा किंवा प्रदर्शन आयोजित करताना आता कडक अटी लागू करण्यात आल्या आहेत. अशा सर्व प्रसंगांसाठी संबंधित जनावरांचे किमान २८ दिवसांपूर्वी लसीकरण झाले असल्याचे प्रमाणपत्र तसेच पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचा आरोग्य दाखला सादर करणे बंधनकारक राहील.

रोगप्रसार रोखण्यासाठी स्थानिक संस्थांना आदेश

लम्पीचा फैलाव रोखण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना कीटकनियंत्रण कार्यक्रम राबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय ग्रामपंचायतीमार्फत जनजागृती उपक्रम राबवून पशुपालकांना सतर्क करण्यात येणार आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, “सण महत्त्वाचा असला तरी पशुधनाचे आरोग्य याहून महत्त्वाचे आहे. बाधित व अबाधित जनावरे एकत्र आल्यास रोगप्रसार वाढू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी दक्षता घेऊन पोळा साजरा करावा.”

अहिल्यानगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा आणि आमचे फेसबुक पेज लाईक करा